मुंबई : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविणाऱ्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत मात्र दारुण पराभव झाला. आधी ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. पण नंतर कथित वाढीव मतदारांवरून केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, बुधवारी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसला सावधगिरीचा इशारा दिला आहे. (Delhi Election 2025: Aditya Thackeray’s appeal to AAP and Congress)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी जाहीर करताना त्यात वारंवार सुधारणा केली. त्यालाच विरोधकांनी आक्षेप घेतला. निवडणू आयोगाच्या आकडेवारीनुसार जवळपास 76 लाख मते जास्त होती. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. पण, अनेक मतदान केंद्रांवर शेवटच्या मतदाराचे मतदान होईपर्यंत केंद्र सुरू असते. त्यानंतर सगळी प्रक्रिया आटोपल्यानंतर मग मतदानाची आकडेवारी दिली जाते, जी स्वाभाविकरित्या संध्याकाळी 6 नंतरची असते. परिणामी, ती जास्त असते, असा खुलासा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला.
Urging the @AamAadmiParty, the @INCIndia and all the independents to keep a close watch tomorrow on the Entirely Compromised (EC) aka Election Commission during voting.
• Please keep a vigil on voter fraud/ bogus voters that the EC allows their political bosses to carry out
•…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2025
मात्र, काँग्रेसने हा खुलासा फेटाळला. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9.7 कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे, पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. मग आयोगाच्या आकडेवारीनुसार 16 लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत, बुधवारच्या मतदानावेळी Entirely Compromised (EC) निवडणूक आयोगावर बारकाईने लक्ष ठेवा, असे आवाहन आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि सर्व अपक्षांना केले आहे. आपल्या राजकीय बॉसला मतदार घोटाळा किंवा बोगस व्होटर्सचा वापर करायला निवडणूक आयोगाची सहमती असल्याने कृपया दक्ष राहा. आपल्या राजकी बॉसच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग शेवटच्या तासाभरात मतदारांची गर्दी दाखवते, पण वास्तविकता दाखवण्यासाठी गरजेनुसार व्हिडीओ कॅमेरे सज्ज ठेवा, अशा सूचनाही आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत. मतदार म्हणून नोंदवलेल्या नागरिकांचा आदर म्हणजे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक असते आणि ते कोणाची निवड करतील तो जनादेश असतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. (Delhi Election 2025: Aditya Thackeray’s appeal to AAP and Congress)
हेही वाचा – Mumbai BMC Budget : मुंबई कात टाकत विकासाकडे जातेय – उपमुख्यमंत्री शिंदे