दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘आप’सह सर्वांनीच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अशात, काँग्रेसही दिल्लीत सत्तेत येण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात गेम चेंजर ठरलेल्या महिला मतदारांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने लक्ष दिलं आहे. त्यानुसार, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. (Delhi Election 2025 congress announced pyari didi scheme for women of delhi)
सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रचाराला सुरूवात केली आहे. अशात सर्वाधिक मताधिक्क्य आपल्याला मिळावे, यासाठी काँग्रेसने दिल्लीतील महिलांसाठी ‘प्यारी दीदी’ योजना आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
“माझा विश्वास आहे की दिल्लीत ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये प्रत्येक महिलेला 2,500 रुपये देण्याची गरज होती. बेरोजगारी, महागाई आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे त्रस्त असलेल्या महिलांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे”, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी प्यारी दीदी योजनेवर प्रतिक्रिया दिली.
याशिवाय, “आपने दिलेली आश्वासने अमलात आणली जात नाहीत, आम्ही आमची योजना कर्नाटकात आधीच लागू केली आहे. आम्ही दिल्लीतील लोकांना विनंती करतो की आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे काही वचन देतो ते पूर्ण करतो”, असे दिल्लीतील काँग्रेसच्या ‘प्यारी दीदी’ योजनेबाबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार दिल्लीत 71 लाख महिला मतदार आहेत. याआधी ‘आप’ने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ‘आप’कडूनही महिलांची नोंदणी केली जात आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या आपनेही पुन्हा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. एका महिलेला मुख्यमंत्री करून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शिवाय, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी, आम आदमी पार्टी महिलांना मासिक स्टायपेंड देणाऱ्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसह नवीन घोषणा देखील करत आहे.