(Delhi Election 2025) नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकची घोषणा काल, मंगळवारी झाली. 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधीच राजधानीत निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. आप अर्थात आम आदमी पार्टीवर भाजपा हल्ला करत असतानाच, काँग्रेसनेही आपलाच लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसप्रणित इंडि आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गट, समाजवादी पार्टी तसेच तृणमूल काँग्रेस या पक्षांनी आपची पाठराखण केली आहे. (Trinamool and SP support AAP with Thackeray group instead of Congress)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संदीप दीक्षित आणि अजय माकन या काँग्रेस नेत्यांनी आपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित हे निवडणूक रिंगणात उतरले असून काँग्रेसने बहुतांश जागांवर तगडे उमेदवार दिले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या इडि आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि आपमध्ये चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे या आघाडीतील इतर पक्षही पुढे सरसावले असून ते काँग्रेसला मवाळ भूमिका घेण्याचा सल्ला देत आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे आधीच आपच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. दिल्लीत भाजपाला मात देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. फक्त आम आदमी पार्टीच भाजपाचा पराभव करू शकते. त्यामुळे आपलाच आम्ही पाठिंबा देऊ, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. यापुढेही आपच्या निवडणूक रॅलीत सहभागी होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही आपचे समर्थन केले आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपचे मजबूत असणे आवश्यक आहे आणि त्यांनी सत्ता आपल्याकडेच राखावी, अशी आमची इच्छा आहे, असे कुणाल घोष यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युती नव्हती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रमुख नेते अधीर रंजन चौधरी यांना तृणमूलच्या युसूफ पठाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
याशिवाय, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत लढलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही काँग्रेसला आम आदमी पार्टीसोबत एकत्र लढण्याचा सल्ला दिला आहे. आप आणि काँग्रेसने दिल्लीत एकत्र निवडणूक लढवावी, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे आपापसात भांडण्यापेक्षा भाजपाच्या विरोधात लढले पाहिजे. खरी लढत भाजपशी असताना दोन्ही पक्ष आपापसात का संघर्ष करत आहेत? असा प्रश्न त्यांनी केला आहे. (Delhi Election 2025 : Trinamool and SP support AAP with Thackeray group instead of Congress)
हेही वाचा – Beed Crime : बीडमध्ये फुटाणे वाटल्याप्रमाणे बंदुकीचे परवाने दिलेले, आता जिल्हाधिकाऱ्यांनी थेट…