फटाके विक्रेत्याने उडवली कोर्टाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

दिल्लीतल्या फटाके विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा दिल्लीतला फटाके विक्रेता 'ग्रीन फटाके' विकताना दिसत आहे. मात्र, हे फटाके ग्रीन नसून त्याने ते भाजीमध्ये टाकले आहेत.

Delhi Firecracker Vendor Viral Video
दिल्लीतल्या फटाके विक्रेत्याने उडवली न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली

दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके कोणते वाजवावेत? किती वाजवावेत? किती वेळ वाजवावेत? यावरून गेल्या काही दिवसांमध्ये मोठा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. थेट सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिल्यानंतरही अनेक स्तरातून या निर्णयांचा विरोध केला जात आहे. देशभरातल्या फटाके विक्रेत्यांकडून न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर दिल्लीतल्या एका फटाके विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा फटाके विक्रेता थेट सर्वेच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच खिल्ली उडवताना दिसत आहेत.

न्यायालयाने जारी केले ‘ग्रीन’ निर्देश!

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीदरम्यान फटाके वाजवण्यावर न्यायालयाने निर्बंध आणले आहेत. दिवाळीत फटाके फक्त दोनच तास वाजवावेत असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, सुरुवातीला फटाके वाजवण्याची वेळ फक्त संध्याकाळी ८ ते १० ठेवण्यात आली होती. मात्र, नंतर ही अट शिथिल करत दिवसाच्या कोणत्याही वेळी फटाके वाजवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मात्र, ही वेळ २ तासांच्या वर जाता कामा नये असेही न्यायालयाने बजावले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘ग्रीन फटाके’ ही संकल्पना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. देशभरात पुढील वर्षापासून पर्यावरण पूरक ग्रीन फटाके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दिल्लीच्या फटाके विक्रेत्याचे ‘ग्रीन’ फटाके!

राजधानी दिल्लीमध्ये हवेचा दर्जा अधिकच खालावल्यामुळे दिल्लीमध्ये याच वर्षीपासून ग्रीन फटाके सक्तीचे करण्यात आले आहेत. मात्र, दिल्ली सरकारच्या या निर्णयावर स्थानिक फटाके विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येत आहे. अशाच एका दिल्लीतल्या फटाके विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा दिल्लीतला फटाके विक्रेता ‘ग्रीन फटाके’ विकताना दिसत आहे. मात्र, हे फटाके ग्रीन नसून त्याने ते भाजीमध्ये टाकले आहेत. आणि हे फटाके विकताना हा विक्रेता न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली उडवताना दिसत आहे.

न्यायालयाच्या निर्णयाची खिल्ली

या व्हिडिओमध्ये शिमला फटाका, करेला फटाका, गोबी फटाका अशी भाज्यांची नावं असलेले फटाके हा विक्रेता विकत आहे. मात्र, शिमला फटाका हा ग्रीन फटाका नसून चक्क शिमला मिर्चीमध्ये घुसवून ठेवलेला फटाका आहे. करेला फटाकामध्येही नेहमीचाच फटाका आहे. गोबी फटाक्याचीही तीच गत आहे. आणि हे फटाके विकताना हा विक्रेता ‘कोर्ट के अनुसार ग्रीव पटाखे ले लो’, असं म्हणत आहे. त्यामुळे त्याने थेट न्यायालयाच्याच निर्णयाची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा – फटाके वेळेतच उडवा; नाहीतर ८ दिवस तुरुंगात जा