‘कोरोनाशी लढणाऱ्या ‘हिरोंचा’ मृत्यू ओढवल्यास कुटुंबियांना १ कोटींची मदत’

Arvind Kejiwal help 1 crore
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली मदत

कोरोनाने संपुर्ण भारतात कहर सुरु केला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या या घडीला दीड हजारांच्या वर गेली आहे. संपुर्ण देशातील आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होऊन देशासाठी कोरोनाशी दोन हात करत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वच्छता दूत हे आज देशाचे हिरो बनले आहेत. कोरोनाशी लढताना या हिरोंचा मृत्यू ओढवल्यास त्यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत दिली जाईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ही मदत सफाई कर्मचारी, डॉक्टर आणि नर्सेससाठी लागू होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार घेऊन सांगितले की, “कोरोना विरोधातील युद्धात सहभागी झालेल्या सर्व कर्माचाऱ्यांच्या पाठिशी दिल्ली सरकार ठामपणे उभे आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसहीत सफाई विभागाचे कर्मचारीही जीवाशी खेळून औषध फवारणीचे काम करत आहेत. यांच्यापैकी कुणालाही दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत देण्यात येईल.”