गेल्या काही दिवसांपासून दिल्ली – NRC मधील हवेतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक नियम लागू केले होते. मात्र शुक्रवारी दिल्लीतील हेवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. दिल्ली – NRC मध्ये पावसामुळे AQI मध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने सम – विषम नियम लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. अशी माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली.
राय म्हणाले, काल रात्रीपासून दिल्लीतील वातावरणात बदल झाला आहे. वाऱ्याचा वेग गेल्या आठ – दहा दिवसांपासून ठप्प होता. तापमानात घट होत होती, प्रदूषणाच्या पातळीमध्ये सतत वाढ होत होती. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती खुपच गंभरी होती. सध्या पावसामुळे प्रदूषणात सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे. आता ४५० च्या वर असलेली प्रदूषणाची पातळी ३०० च्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने आता १३ (नोव्हेंबर) ते २० (नोव्हेंबर) पर्यंत सम-विषम नियम लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. म्हणजेच दिल्लीत सम विषम नियम २० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. दिवाळीनंतर या नियमाबाबत पुन्हा बैठक होणार असून २० तारखेनंतर नियमांची अंमलबजावणी करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असं ही गोपाय राय म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणला हैराण झालेल्या दिल्लीतील नागरिकांना गुरूवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिल्लीतील हेवच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येत आहे. सकाळी दिल्लीतील हवा निर्देशांक (AQI) गुरूवारी दुपारी ४ वाजता ४३७ होता, जो शुक्रवारी सकाळी ७ वाजता ४०८ आणि नंतर दोन तासांनंतर सकाळी 9 ते 376 पर्यंत सुधारला. वाऱ्याचा वेग प्रदूषकांच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय हवामान विभागने सांगितले की, दिल्लीचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता गेल्या 24 तासांत सहा मिमी पावसाची नोंद केली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्लीतील बहुतांश भागात हलका पाऊस झाला. याशिवाय नोएडा, गुरुग्राम आणि इतर शेजारच्या भागातही हलका ते मध्यम पाऊस झाला.