घरदेश-विदेशराजधानीला प्रदूषणाचा विळखा; आरोग्य आणीबाणी जाहीर

राजधानीला प्रदूषणाचा विळखा; आरोग्य आणीबाणी जाहीर

Subscribe

पुढील आठवड्यात दिल्लीतील वायू गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीची दखल घेत पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळीत फटाके फोडल्यामुळे राजधानी दिल्लीला वायू प्रदूषणाचा विळखा पडला आहे. परिणामी राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली असून पुढील आठवड्यात दिल्लीतील वायूची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे. या परिस्थितीची दखल घेत पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान दिल्लीतील शाळकरी मुलांसह नागरिकांनी देखील प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी मास्क वापरावेत, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

पंजाब हरियाणातील पराली ठरतेय कारणीभूत

दिवाळीच्या दिवसांमध्ये दिल्ली शहरात गॅस चेंबर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे फटाके वाजवण्यावर बंदी घातली होती. त्याऐवजी पर्यावरणपूरक फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्याचे आदेश दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यातच हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेला पराली असे म्हणतात. या शेतजमिनी जाळण्याच्या प्रक्रियेमुळे त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते.

- Advertisement -

दिल्लीतील परिस्थिती गंभीर

केंद्र सरकारच्या वायू गणुवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थेने हवामानात होणाऱ्या बदलामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब झाल्याचा दावा केला आहे. हवेची गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी असेल तर हवेची गुणवत्ता श्रेणी उत्तम मानली जाते. तर ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० घातक, ३०१-४०० अत्यंत घातक, ४०१-५०० अत्यंत गंभीर या श्रेणींमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते. शुक्रवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनसुद्धा अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती. यामुळे दिल्लीकरांना मास्क लावून घराबाहेर पडावे लागत होते.

शाळकरी मुलांना मास्कचे वाटप

वायू प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने शाळकरी मुलांना मास्कचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाळकरी मुलांना मास्कचे वाटप केले. दिल्लीत ५० लाख मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. दिल्लीतील शाळकरी मुलांसह नागरिकांनी देखील प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी मास्क वापरावेत, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी दिल्लीतील सर्व शाळा ५ नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -