दिल्ली: दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन डॉक्टर जे एमबीबीएमस होते ते अशा दोन लोकांची मदत घेत होते ज्यांनी डॉक्टरची पदवी संपादन केलेली नव्हती. हे दोन्ही बोगस डॉक्टर लोकांवर शस्त्रक्रिया करत होते. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. (Delhi Operation Scam greater Kailas Shocking Being the doctor s wife she was doing the operation Many patients die prematurely)
दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास परिसरातून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. त्यांच्या दवाखान्यात कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळले जात होते. या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेनंतर 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा हा खुलासा झाला. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या चार आरोपींसोबत फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याच रुग्णालयात हा डॉक्टर लोकांवर शस्त्रक्रियाही करत होता, अशी माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी अनेकांना अटक केली जाऊ शकते. हे प्रकरण दक्षिण दिल्लीच्या पॉश भागात असलेल्या ग्रेटर कैलाशमध्ये असलेल्या अग्रवाल मेडिकल सेंटरचे आहे. येथे ऑक्टोबर महिन्यात 45 वर्षीय व्यक्तीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. याप्रकरणी चार डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.
डॉ. नीरज अग्रवाल, त्यांची पत्नी पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत आणि ओटी तंत्रज्ञ महेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वृत्तसंस्थेनुसार, नीरज आणि जसप्रीत हे स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत. मात्र पूजा आणि महेंद्र हे डॉक्टर असल्याचे दाखवून लोकांवर शस्त्रक्रिया करत होते. डॉक्टर नीरज वैद्यकीय पदवीही नसलेल्या पत्नी पूजाकडून ऑपरेशनमध्ये मदत घेत होता.
या लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एका 45 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची तक्रार पोलिसांना मिळाल्यावर त्यांना हे प्रकरण संशयास्पद वाटले. कारण 2022 मध्येही येथे एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. प्रसूती वेदनांमुळे तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्रसूती न करताच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
या डॉक्टरांनी सफदरजंग रुग्णालयात केलं होतं काम
मिळालेल्या माहितीनुसार, हे अग्रवाल मेडिकल सेंटर डॉ. नीरज अग्रवाल यांचे आहे. नीरजने यापूर्वी सफदरजंग रुग्णालयात काम केले आहे. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी हे वैद्यकीय केंद्र उघडले ज्यामध्ये त्यांची पत्नी पूजा अग्रवाल रिसेप्शनिस्ट आणि नर्सिंग स्टाफ म्हणून काम करत होत्या. महेंद्रने या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन टेक्निशियन म्हणूनही काम केले. या तिघांनी या रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. जसप्रीत यांचे लेटरहेड ठेवले होते.
पोलिसांनी एमबीबीएस डॉक्टरसह चौघांना केली अटक
या रुग्णालयात कोणताही रुग्ण आला तर त्याला ऑपरेशन करण्यास सांगितले जायचे. डॉक्टर जसप्रीत याच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार करण्यात आले होते. तर, तंत्रज्ञ महेंद्र आणि पूजा ऑपरेशन करायचे. या लोकांच्या निष्काळजीपणामुळे ऑपरेशननंतर अनेकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आता या लोकांसह रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यासोबतच अग्रवाल मेडिकल सेंटरचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी मेडिकल कौन्सिलला पत्रही लिहिले आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की ते या प्रकरणात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्याशी संबंधित कलमेदेखील लावरणार आहेत.
(हेही वाचा: गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली राजधर्माची आठवण; म्हणाले… )