राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या? नोटीसला उत्तर न दिल्याने दिल्ली पोलीस घरी धडकले

राहुल गांधी यांच्या विधानानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना एक नोटीस बजावली. त्यात राहुल गांधींना काही प्रश्न विचारण्यात आले.

Delhi Police On Rahul Gandhi House

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबाबत लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून खळबळ माजली आहे. त्यानंतर संसदेत वेगवेगळ्या हालचालींना वेग आलाय. त्यांच्या या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बरखास्त करण्याची मागणी सुरू केलीय. हे संकट कमी होतं की काय म्हणून राहुल गांधी यांच्यासमोर आणखी एक नवं संकट उभा राहिलंय. राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल झाले आहेत. विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील लैंगिक पीडितांबाबत त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस बजावून लैंगिक पीडितांची माहिती देण्यास सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत राहुल गांधींनी नोटीसला उत्तर दिलेले नाही.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये आले होते. त्यावेळी येथे महिलांचे लैंगिक आणि शारीरिक शोषण होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं होतं. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर नोटीस जारी करून दिल्ली पोलिसांनी त्यांना त्या सर्व महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यावर कारवाई करू शकू, असं पोलिसांनी सांगितलंय. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे, असं सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं.

नक्की काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले होते की, “जेव्हा मी चालत होतो, तेव्हा खूप स्त्रिया रडत होत्या… त्यांच्यापैकी अनेक होत्या ज्यांनी मला सांगितले की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचा विनयभंग झाला आहे. काहींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा विनयभंग केला आहे. जेव्हा मी त्यांना विचारले की, मी पोलिसांना सांगायला हवं, त्यांनी मला नको असे सांगितले. त्या म्हणाल्या त्यांना मला माहिती द्यायची होती, परंतु त्यांनी दिलेली माहिती मी पोलिसांना सांगू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या म्हणाल्या की, त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल. हेच आपल्या देशाचे वास्तव आहे.

काय विचारलंय नोटीसमध्ये?
राहुल गांधी यांच्या विधानानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना एक नोटीस बजावली. त्यात राहुल गांधींना काही प्रश्न विचारण्यात आले. “तुम्हाला भेटल्यानंतर महिलांनी हे केव्हा आणि कोणत्या ठिकाणी सांगितले?, तुम्ही या स्त्रियांना आधीपासून ओळखत होता का? तुम्ही त्या महिलांना कसे ओळखता? तुम्ही सोशल मीडियावर जे बोलता त्याची तुम्ही शहनिशा करता का? महिलांनी काही विशिष्ट घटनेची माहिती दिली का?” अशा अनेक प्रश्नांचा या नोटिसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

नोटीस घेतल्यानंतर बुधवारी दिल्ली पोलिसांचे एक वरिष्ठ अधिकारी राहुल गांधींना भेटायला गेले, मात्र तीन तास प्रतीक्षा करूनही राहुल गांधी त्यांना भेटले नाहीत. दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची वेळ मागितली. मात्र, आपल्याकडे वेळ नाही, असं राहुल गांधी यांनी त्यांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस बजावली. या प्रकरणाचा वेगाने तपास व्हावा म्हणून या नोटिशीला लवकरात लवकर उत्तर देण्यास पोलिसांनी सांगितलं होतं.