Diwali 2018 : दिल्लीमध्ये ३,८०० किलो फटाके जप्त

नियमांचं उल्लंघन केल्यानं राजधानी दिल्लीतील २६ फटाके विक्रेत्यांना अटक करण्यात अाली आहे. तर ३८०० किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.

firecrackers

देशभरात सध्या जोरात दिवाळी सुरू आहे. पण, दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयानं काही नियम देखील आखून दिले आहेत. पण याच नियमांचं उल्लंघन करणं राजधानी दिल्लीतील २६ जणांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जवळपास ३८०० किलो फटाके जप्त करण्यात आले असून याप्रकरणी २६ जणांना अटक देखील करण्यात आली आहे. केवळ परवाना असलेल्यांना फटाक्यांची विक्री करता येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याला जबाबदार धरण्यात येईल असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. पण, न्यायालयाच्या या निर्णयाचा अवमान करत फटाक्यांची विक्री करत असलेल्या २६ जणांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे ऐनदिवाळीत त्याचे दिवाळे निघाले असे म्हणावे लागेल. दिवाळीच्या काळात दिल्लीतील हवेची पातळी आणखीनच खालावली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणात हवेच्या प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे.

वाचा – फटाके विक्रेत्याने उडवली कोर्टाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

आम्ही देखील यासंदर्भात योग्य ती पावलं उचलली असून लोकांनी काय करावे आणि काय करू नये याची माहिती दिल्याचं दिल्लीच्या उत्तर विभागाच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले. तसेच शाळा, सोसायटींमध्ये देखील यासंदर्भात जनजागृती केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. ऑक्टोबर , नोव्हेंबरमध्ये दिल्लीकरांना मोठ्या प्रमाणावर हवेच्या प्रदुषणाचा सामना करावा लागत. त्यामध्ये दिवाळीच्या तोंडावर आणखी वाढ होते. वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीकर देखील शक्य तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाचा – दिवाळी फटाके प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचे नवे निर्देश!

वाचा – फटाक्यांवर सरसकट बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय