Delhi Red Fort : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावला? वाचा सत्य!

Delhi Violence image

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला २६ जानेवारी रोजी बट्टा लागला. आंदोलनादरम्यान एका गटाने आक्रमक होत थेट लाल किल्ल्यापर्यंत मजल मारली. लाल किल्ल्यावर चढून तिथे धार्मिक निशाणी फडकावण्यात आली. तसेच, पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये तब्बल ८६ पोलीस जखमी झाले. या प्रकारानंतर मात्र, इंटरनेटवर काही जणांनी, लाल किल्ल्यावर चढलेल्या आंदोलकांनी देशाचा तिरंगा ध्वज खाली उतरवून खलिस्तानी झेंडा फडकावल्याचा दावा करत आरोप करायला सुरुवात केली आहे. पण एएनआयने दिलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक असं कोणतंही कृत्य करत नसल्याचं दिसत आहे.

एएनआयने दिलेल्या एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक लाल किल्ल्यावर चढल्याचं दिसत आहे. मात्र, या आंदोलकांनी एका रिकाम्या पोलवरच दोन झेंडे लावले आहेत. यामधला एकही झेंडा खलिस्तानी असल्याचं दिसत नाही. हे झेंडे शीख धर्मियांमध्ये मानाचे समजले जाणारे निशाणी साहिब आहेत. तसेच, बाजूला भारतीय तिरंगा ध्वज तसाच फडकत असून दुसऱ्या पोलवर हा ध्वज फडकावण्यात आला असल्यामुळे तिरंगा उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावल्याचा दावा आंदोलकांकडून फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये देखील तिरंगा बाजूला फडकत असताना आंदोलकांनी दुसऱ्याच पोलवर झेंडा फडकावल्याचं दिसत आहे.

Delhi Violence

दरम्यान, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आंदोलक नसून इतर शक्ती गुंतल्या असल्याचा दावा आता आंदोलक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. यामध्ये जीप सिद्धू, लक्खा सिधाणा यांच्यावर शेतकरी आंदोलकांना लाल किल्ल्यावर चढण्यासाठी उद्युक्त केल्याचा आरोप केला जात आहे.