घरदेश-विदेशत्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरातील व्हीआयपी पेड दर्शन बंदीची मागणी, पुरातत्व खात्याचाही आक्षेप

त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरातील व्हीआयपी पेड दर्शन बंदीची मागणी, पुरातत्व खात्याचाही आक्षेप

Subscribe

नवी दिल्ली : त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Temple) केंद्रिय संरक्षित स्मारक असून हे मंदिर प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्याच्या तरतुदीत मोडते. त्यामुळे या मंदिरात सुरू असलेले व्हीआयपी पेड दर्शन चुकीचे असून ते तात्काळ बंद करण्याची मागणी तसेच विविध सूचना भारतीय पुरातत्त्व खात्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

भारतीय पुरातत्त्व खात्याचे डी.एस. दानवे, दीपक चौधरी आणि सुपरीटेंडिंग आर्कियॉलॉजिस्ट यांच्या समितीने त्र्यंबकेश्वर येथील मंदिराला 15 मार्चला भेट देऊन या मंदिराची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये त्यांना मंदिरात काही बाबी आढळून आल्या. या बाबींबाबत 16 मार्च रोजी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना समितीकडून पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रामध्ये व्हीआयपी पेड दर्शन तात्काळ बंद करणे तसेच विविध सूचना स्पष्ट करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधी लोकसभा सदस्यत्व रद्द : भारतातील घटनाक्रमांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे लक्ष

महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले अडथळे, तात्पुरती दर्शनबारी, ठिकठिकाणी ठेवलेल्या दानपेट्या आणि दानाची रक्कम जमा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या केबिन हटविण्याच्या सूचना भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याशिवाय मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये काही बिनकामाचे सामान ठेवले आहे, तेही तातडीने हटविण्याच्या सूचनाही मंदिर ट्रस्टला करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पेड दर्शनाबाबत उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरु करण्यात आलेल्या पेड दर्शनाबाबत उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाकडून याबाबत न्याय मिळेल याची खात्री याचिकाकर्त्या ललिता शिंदे यांना आहे. तसेच पुरातत्व खात्याने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पेड दर्शन हे ऐच्छिक
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने पाठविण्यात आलेले पत्र अद्याप आमच्या बघण्यात आलेले नाही, असे विधान त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी केले आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरु करण्यात आलेले पेड दर्शन हे ऐच्छिक असून याबाबतचा निर्णय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याबद्दल आताच काही निर्णय करणे उचित होणारे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -