लोकशाही धोक्यात…, तृणमूल खासदार महुआ मोइत्रांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे परदेशातील वक्तव्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरून लोकसभा आणि राज्यसभेत सलग तीन दिवस गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधीर रंधन चौधरींपाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी सभागृहातील माइकवरून लोकसभेच्या सभापतींवर निशाणा साधला आहे. लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपल्या लंडनच्या दौऱ्यात मोदी सरकारवर टीका करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसंदेत विरोधकांचे माइक बंद असतात अशी टीका केली होती. ज्येष्ठ भारतीय वंशाचे विरोधी मजूर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी हाऊस ऑफ कॉमन्स संकुलातील ग्रँड कमिटी रूममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधकांचा आवाज कसा बंद केला जातो हे सांगितले. आमचे माइक खराब होत नाहीत, ते काम करतात, परंतु आम्ही ते चालू करू शकत नाही. मी बोलत असताना हे माझ्यासोबत अनेकदा घडले असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कालच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. संसदेतील माईक तीन दिवसांपासून बंद आहे. खासदार चौधरी यांनी याची तक्रार केली आहे. संसदेत मी बसतो, त्या ठिकाणी असलेला माईक तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मला चर्चेत सहभागी होता येत नाही. माझे मत मला मांडता येत नाही, असे पत्र खासदार चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. मोदी सरकारला संसदेचे काम चालू द्यायचे नाही. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशीही तक्रार खासदार चौधरी यांनी पत्रात केली आहे.

आता त्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरून हाच मुद्दा उपस्थित केला आहे. महुआ मोइत्रा यांनी ट्वीटमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर माइक बंद केल्याचा आरोप केला आहे. गेल्या तीन दिवसांत ओम बिर्ला यांनी केवळ भाजपा खासदारांना माइकवर बोलण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर सभागृह तहकूब केले. एकाही विरोधी खासदाराला बोलू दिले नाही. लोकशाही धोक्यात आली आहे, असे सांगतानाच या ट्वीटसाठी मी तुरुंगात जाण्यासही तयार असल्याचे मोइत्रा यांनी म्हटले आहे.