Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशDevendra Fadnavis : आमचा मराठी माणूस पुन्हा दिल्ली जिंकणार, फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

Devendra Fadnavis : आमचा मराठी माणूस पुन्हा दिल्ली जिंकणार, फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

Subscribe

तब्बल सात दशकांनंतर नवी दिल्ली होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा या संमेलनातून दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो आहे.

नवी दिल्ली : तब्बल सात दशकांनंतर नवी दिल्ली होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेनल होत आहे. मराठी साहित्य संमेलन असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा या संमेलनातून दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो आहे. (Devendra Fadnavis statement at the 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan is under discussion)

आपल्या सर्वांकरता अभिमानाची गोष्ट आहे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो. कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असं स्वप्न जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये होतं. ते स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. मला असं वाटतं की, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन दिल्लीत याकरता होत आहे की, ज्या वेळेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ याची वाट सरस्वतीचे सर्व पुत्र पाहत होते. त्यामुळेच आज हे संमेलन दिल्लीमध्ये होत आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – PM Modi : मी मराठी शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो, साहित्य संमेलनात मोदींचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील एकप्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवलं की, संपूर्ण राज्यकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल. तसेच राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते, ते सर्व शब्द बदलून आपले मराठी शब्द वापरण्याची सक्ती आणि आज्ञावली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा तयार केली. म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलो आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोठा योगायोग आहे की, ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम होणार आहे, त्याचठिकाणी 1737 साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती. त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती. त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा या संमेलनातून दिल्ली जिंकणार आहे, हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मराठी माणसाचा उल्लेख केला, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा – Chhaava : मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांकडून छावाचा उल्लेख, उपस्थितांनी दिल्या घोषणा