विमानात मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना खाली उतरवा, DGCA च्या विमान कंपन्यांना सूचना

मास्क फक्त अत्यावश्यक कामासाठी काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊन जर मास्क वापरण्यापासून प्रवाशाने टाळाटाळ केली तर त्याला उड्डाण करण्यापूर्वी विमानातून खाली उतरवण्यात यावे.

DGCA notice to airlines to take action on non masked passengers

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्र सरकार सतर्कतेने उपाययोजना करत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांद्वारे कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू नये यासाठी विमान प्रवासादरम्यान अधिक काळजी घेतली जात आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क वापरला नाही तर त्यांना विमानातून खाली उतरवण्यात यावे अशा सूचना विमान नियामक DGCA ने दिल्या आहेत. विमानात प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचना देऊनही प्रवाशी ऐकत नसेल तर त्याला खाली उतरवण्यात यावे असे निर्देश आता डीजीसीएने दिले आहेत. यामुळे विमान प्रवासादरम्यान मास्क सक्तीचा आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक परिपत्रक जारी केले आहे. विमानतळ संचालकांनी स्थानिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. डीजीसीएचे परिपत्रक दिल्ली उच्च न्यायालयाच्या ३ जून रोजीच्या निर्णयानंतर काढण्यात आले आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना दंड ठोठावण्यात यावा आणि सातत्याने थकबाकीदारांना ‘नो फ्लाय’ यादीत टाकण्यात यावे.

विमानतळांवर आणि विमानांवर तैनात असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना अशा प्रवासी आणि इतरांवर कठोर कारवाई करण्यासाठी DGCA ला स्वतंत्र बंधनकारक सूचना जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच जे मास्क वापरण्याच्या आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मास्क फक्त अत्यावश्यक कामासाठी काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊन जर मास्क वापरण्यापासून प्रवाशाने टाळाटाळ केली तर त्याला उड्डाण करण्यापूर्वी विमानातून खाली उतरवण्यात यावे.

डीजीसीएने विमानातील स्टाफ, केबिन क्रू आणि पायलटलासुद्धा मास्क वापरण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विमान तळावरील सुरक्षा व्यवस्थेने कोणालाही मास्क घातल्याशिवाय आतमध्ये सोडले नाही पाहिजे. तसेच एखाद्या प्रवाशाने उड्डाण केल्यानंतर मास्क घालण्यास नकार दिला तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. अशा प्रवाशांना अनियंत्रित प्रवासी म्हणून नमूद केले जाईल.


हेही वाचा : EPFO : UAN शिवाय येतायत अडचणी, PF खातेधारक असा ऑनलाईन करू शकतात जनरेट