डिजिलॉकर बनले ‘हेल्थ लॉकर’, वैद्यकीय कागदपत्रे करता येतील संग्रहित

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे ‘डिजिलॉकर’ हे आता ‘हेल्थ लॉकर’ बनले आहे. डिजीलॉकरचे सुरक्षित क्लाउड-आधारित स्टोअरेज प्लॅटफॉर्म लसीकरण रेकॉर्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅब चाचण्‍यांचे अहवाल, रुग्णालयातून घरी पाठवताना दिलेल्‍या वैद्यकीय अहवालाचा सारांश इत्यादी आरोग्यनोंदी संग्रहित करण्यासाठी वापरता येईल. आरोग्य लॉकर सेवा आता डिजिलॉकरच्या सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण करणारे अधिकृत व्यासपीठ आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनसह (एबीडीएम) त्याचे दुसऱ्या टप्प्यावर एकत्रीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर आयुष्मान भारत आरोग्य खातेनिर्मितीची (एबीएचए – Ayushman Bharat Health Account) सुविधा उपलब्‍ध झाली. त्‍यानुसार 13 कोटी वापरकर्त्यांना जोडण्‍यात आले आहे. अद्ययावत इंटिग्रेशन वापरकर्त्यांना डिजीलॉकरचा आता वैयक्तिक आरोग्य नोंदी (पीएचआर – Personal health records) अॅप म्हणून वापर करता येणार आहे.

या व्यतिरिक्त, एबीएचएधारक त्यांच्या आरोग्य नोंदी विविध रुग्णालये आणि प्रयोगशाळांमधून एबीडीएम नोंदणीकृत आरोग्य सुविधा लिंक करू शकतात आणि ते डिजfलॉकरद्वारे हव्‍या त्‍यावेळी पाहू, वापरू शकतात. वापरकर्ते अॅपवर त्यांचे जुने आरोग्य रेकॉर्ड स्कॅन आणि अपलोड करू शकतात. ते एबीडीएम नोंदणीकृत आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत निवडक नोंदी सामायिक करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले, डिजिलॉकर हे मूळ दस्तऐवज पाहण्‍यासाठी एक विश्वसनीय आणि लोकप्रिय अॅप आहे. वापरकर्त्यांना आता ते पीएचआर अॅप म्हणून वापरता येईल आणि कागदविरहीत नोंदी ठेवण्याचे फायदे मिळतील.

या मंचाने आधीच 85 हजार एबीएचए क्रमांक तयार करण्यात मदत केली आहे. ‘हेल्थ लॉकर इंटिग्रेशन’बाबत आम्ही सकारात्मक आहोत. कारण, अधिक लोक अगदी सहजपणाने त्यांची आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने लिंक करू शकतील आणि सुरक्षित ठेवून आवश्‍यक तेव्हा त्‍यांचा वापर करू शकतील. डिजिलॉकरचे एबीएचए वापरकर्त्यांचे प्राधान्य लक्षात घेऊन हेल्थ लॉकर बनण्याचे उद्दिष्ट आहे, असे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे व्यवस्‍थापकीय संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग म्हणाले.