दिग्विजय सिंह यांच्या कारने बाइकस्वाराला दिली धडक, पोलिसांची त्वरित कारवाई

digvijay-singh
digvijay-singh

भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कारने एका बाइकस्वाराला धडक दिली. राजगड जिल्ह्यात हा अपघात झाला असून ही बाइक अचानक दिग्विजय सिंह यांच्या कारसमोर आली. पोलिसांनी याप्रकरणी ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल करून गाडी जप्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पुरोहित यांच्या आईच्या निधनाबद्दल सांत्वन करण्यासाठी दिग्विजय सिंह गुरुवारी गेले होते. तेथून ते परतत असताना जिरापूर येथील शिक्षक कॉलनीजवळ 25 वर्षीय बबलू मांगीलाल बागरी हा बाइकस्वार दिग्विजय सिंह यांच्या कारसमोर आला. त्यानंतर कार आणि दुचाकीची धडक झाली. कारने धडक दिल्यावर बाइकस्वार खांबाला आपटला. अपघातानंतर दिग्विजय सिंह यांनी गाडीतून खाली उतरून तरुणाची विचारपूस केली.

बबलू मांगीलाल बागरी याला प्रथम जिरापूर रुग्णालयात आणण्यात आले, नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने भोपाळला रेफर करण्यात आले. तथापि, तो तरुण अचानक कारसमोर आला, मात्र त्याला फारशी दुखापत झाली नाही. मी त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि मी स्वत: त्याला भेटलो असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले.

या अपघाताची माहिती मिळताच ब्यावराचे माजी आमदार पुरुषोत्तम दांगी हेही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी बबलूला जिरापूरच्या रुग्णालयात नेले. दिग्विजय सिंह देखील रुग्णालयात पोहोचले, त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडून जखमी तरुणाची प्रकृती कशी आहे, याची माहिती घेतली. तसेच त्याला चांगले उपचार देण्यासही त्यांनी डॉक्टरांना सांगितले. तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला भोपाळला रेफर करण्यात आले. दिग्विजय सिंह यांनी स्वत: भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यासाठी व्यवस्था केल्याचे सांगण्यात येते.

अपघातानंतर जिरापूर पोलिसांनी बाइकस्वाराच्या तक्रारीवरून, निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह दुसर्‍या गाडीतून राजगडला रवाना झाले.