स्थलांतरितांच्या अंगावर जंतुनाशक फवारले, व्हिडीओ व्हायरल

कोरोनाचा वाढता धोका बघून भारतात २१ दिवासांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे. मात्र यामुळे कोरोनाच्या संसर्गाच्या शक्यताही वाढल्या आहेत. परिणामी काही राज्यांमध्ये या स्थलांतरितांना आहे त्याच ठिकाणी राहण्याची सोय सरकारकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात शेकडो स्थलांतरितांच्या अंगावरच जंतुनाशक फवारणी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्व नागरिक बसने दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशमध्ये आले होते.

या स्थलांतरितांच्या जथ्यात पुरुषांबरोबरच लहान मुले, महिलांचाही समावेश आहे. पोलीस बंदोबस्तात भररस्त्यात या नागरिकांवर जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून फवारणी करणारे कर्मचारी सगळ्यांना डोळे बंद करा. मुलांनाही डोळे बंद करण्यास सांगा असे सांगत आहेत. तसेच आम्ही हे मुद्दाम करत नसून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जे आवश्यक वाटतयं ते आम्ही करत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील प्रत्येक राज्य सतर्कता बाळगत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून रस्त्यांवर जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. पण देशात नागरिकांच्या अंगावर जंतुनाशक फवारण्याची ही पहिलीच धक्कादायक घटना आहे.