डिस्ने कंपनीकडून पुढील महिन्यात 4000 नोकऱ्यांमध्ये कपात

नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज डिस्ने (Disney) कंपनी जागतिक मंदीच्या भीतीमुळे मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. एप्रिलमध्ये जागतिक स्तरावर ४००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा विचार करत आहे. डिस्नीने कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला जागतिक मंदीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. मेटा, विप्रोनंतर आता मनोरंजन क्षेत्रातील डिस्ने कंपनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करणार आहे. डिस्ने कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना नोकरकपातीसाठी उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले आहे. कंपनी एप्रिल महिन्यामध्ये चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. मात्र, कंपनी ही चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून एकत्र काढणार की, थोडे-थोडेकरून काढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
डिस्नी कंपनी 3 एप्रिल रोजी होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी नियोजित नोकरकपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. डिस्नी कंपनी आर्थिक मंदीच्या सावटाखाली भविष्यातील उपाययोजनांची तयारी करत आहे. यासोबतच कंपनी पुर्नरचना करून खर्चही कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे कंपनीने चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सर्व क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फटका बसल्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. डिस्नी कंपनीने या आधी सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. परंतु आता डिस्नी कंपनी चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार आहे.

विप्रो कंपनीकडूनही नोकरकपात
जागतिक आर्थिक मंदीच्या सावटाखाली विप्रो (wipro) कंपनीनेही आणखी कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कामावरून कमी केलेल्या 120 कर्मचार्‍यांना मे महिन्यात कामावरून काढण्यात येणार आहे. सध्या या कर्मचार्‍यांना नोटीसचा कालावधी पूर्ण करावा लागणार असून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार आणि सुविधा देणार आहे. विप्रोकडून नोकरकपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंपनीने 2022 मध्ये कर्मचार्‍यांना कामावरून काढले होते. कंपनीने सप्टेंबर महिन्यात 300 कर्मचार्‍यांना नारळ दिला होता.