नवी दिल्ली : डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतली असून मोठ्या थाटात ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधीनंतर केलेल्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुवर्ण काळाला आता सुरुवात झाली आहे, असे म्हटले. कत याआधी कधीही न पाहिलेली अमेरिका आता पाहायला मिळेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. ट्रम्प यांच्यासोबतच यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी घेतली शपथ घेतली. डोनाल्ड ट्रप्म यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 10.30 वाजता पार पडला. (Donald Trump Oath Ceremony sworn in for the second time)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईने 1955 मध्ये एक बायबल दिले होते. त्यावर हात ठेवून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती शपथ घेताना फक्त 35 शब्दात शपथ घेतली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ 35 शब्द असतात. “मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन.” असे ते यावेळी म्हणाले. वॉशिंग्टनपासून जवळ असलेल्या व्हर्जिनिया येथे ‘ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब’ येथे ट्रम्प यांच्या स्वागतानिमित्त आतषबाजी करण्यात आली. वॉशिंग्टनमधील तापमान कमालीचे थंड असल्याने उद्घाटनाचा संपूर्ण सोहळा सभागृहात पार पडला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा शपथविधी परंपरेप्रमाणे काँग्रेसच्या पायऱ्यांवर होतो. यंदा मात्र त्यात बदल करण्यात आला. अशी परिस्थिती 40 वर्षांपूर्वी, 1985 मध्ये उद्भवली होती. त्यावेळी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दुसऱ्या अध्यक्षपदाची शपथ बाहेर न घेता काँग्रेसमध्ये घेतली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते. रिलायन्स उद्याोग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ‘रिलायन्स फाउंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी वॉशिंग्टनमध्ये थपथविधीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीला हजेरी लावली.