कँटिनमध्ये गप्पा मारत बसू नका…, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा युवा वकिलांना सल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयांमध्ये विविध प्रलंबित खटले निकाली लावण्यावर भर देतानाच नव्या वकिलांना सरन्यायाधीशांसह अन्य न्यायमूर्तींकडून काही सल्लेही दिले जात आहेत. हे सल्ले त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. असाच एक सल्ला न्यायमूर्ती एम. आऱ. शाह यांनी दिला आहे. कँटिनमध्ये गप्पा मारत बसण्याऐवजी कोर्टरूममध्ये बसा, असे ते युवा वकिलांना म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अलीकडेच सुनावणीदरम्यान खटल्याशी संबंधित टिप्पणे तसेच फाइलशिवाय आलेल्या एका तरुण वकिलाला फटकारले होते. न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी टिप्पणीची कागदपत्रे (ब्रीफ) न आणणारा वकील हा बॅटशिवाय मैदानात उतरणाऱ्या सचिन तेंडुलकरसारखा आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले होते. जेव्हाही तुम्ही न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर रहाल तेव्हा, संबंधित फाइल्स व्यवस्थित वाचा. जेव्हा वरिष्ठ वकील अनुपस्थित असतील, तेव्हा युक्तिवाद करण्याची संधी घ्या, असा सल्लाही सरन्यायाधीशांनी त्या तरुण वकिलाला दिला होता. त्यापाठोपाठ आता न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी युवा वकिलांना कँटिनऐवजी कोर्ट रूममध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एका जामीनअर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायमूर्ती शाह यांनी आपल्या सुरुवातीच्या काळाचा उल्लेख केला. वकिलीच्या कारकिर्दीला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी अनेकदा कोर्टरूममध्ये बसून राहात होतो. ज्येष्ठ वकील आपला खटला कसा सादर करतात आणि ते कसा युक्तिवाद करतात, हे पाहात होतो. तुम्हालाही जसा वेळ मिेळेल, तसे तुम्ही कोर्टरूममध्ये जाऊन बसत राहा, असे न्यायमूर्ती एम. आर. शाह म्हणाले.

न्यायमूर्ती शाह यांनी काही ज्येष्ठ वकिलांची नावे घेत सांगितले की, तुम्ही या वकिलांकडून शिकू शकता. तुम्ही प्रत्येकाकडून काही ना काही तरी शिकू शकता. तसेच कोर्टात सादरीकरण करताना कधी अतिउत्साह दाखवू नये. कारण असे केल्याने न्यायालय कधी-कधी आपले मत बदलू शकते, असा दुसरा सल्लाही न्यायमूर्ती शहा यांनी दिला. त्यांच्या या मुद्यावर उपस्थित वकिलांनीही सहमती दर्शवली.