“एकच भाषा देशाच्या प्रगतीसाठी योग्य, पण…”

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हिंदी भाषेच्या सक्तीवरील वक्तव्यानंतर दक्षिणेतील राज्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे.

kamalrajini

दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधाला आता सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील पाठींबा दिला आहे. तामिळनाडूसह दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर हिंदी भाषेची सक्ती करु नये, असे म्हणत रजनिकांत यांनी कमल हासन यांच्या सुरात सूर मिळवला आहे. दरम्यान हिंदी भाषानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक राष्ट्र, एक भाषा’ या सूत्राचं आग्रह धरला होता. त्यामुळे कमल हासन यांनी अमित शहा यांना अप्रत्यक्षरित्या खडे बोल सुनावले होते.

काय आहे प्रकरण?

हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक राष्ट्र, एक भाषा’ या सूत्राचा नारा दिला. यावेळी अमित शहा म्हणाले होते की, “देशात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा देशाच्या एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.” अमित शहा यांच्या या प्रतिक्रियेनंतर दक्षित भारतातील राज्यांमध्ये या बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेते कमल हासन यांनी या बाबत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “कोणताही शहा तसेच सुलतान ‘विविधतेत एकता’ या घटनेतील तत्त्वला आव्हान देऊ शकत नाही.”

हेही वाचा – ‘द बिग बुल’साठी विवेक अभिषेकला म्हणाला All the Best!

रजनीकांत यांचाही विरोध

कमल हासन यांच्या हिंदी विरोधातील सुरात सूर मिळवत सुपरस्टार रजनीकांत म्हणाले की, “एकच भाषा ही देशाच्या प्रगतीसाठी चांगली असते. पण, भारतात ते धोरण राबवता येऊ शकत नाही. कारण भारतात कोणतीही एक भाषा कॉमन नाही. त्यामुळेच तामिळनाडूसह दक्षिणेतील कोणत्याही राज्यावर हिंदी थोपविण्यात येऊ नये, असे केल्यास हे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील.”