मुंबई : मणिपूर हिंसाचार आणि केंद्र सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव यावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन गाजले. पण त्यापाठोपाठ आता मोदी सरकाररने 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून त्यामध्ये पाच बैठका होणार आहेत. त्यावरून शिवसेनेच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि त्याच वेळेला नेमकं लोकसभेचे अधिवेशन लागले आहे.
आता सण-उत्सव सुद्धा साजरे करायचे नाहीत अशी भूमिकाच दिसतेय हिंदुत्ववादी पक्षांची. आपण गणपती पेक्षा मोठे आहोत असं समजू नका म्हणजे नशीब.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 31, 2023
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 23 दिवस होता आणि त्यात 17 बैठका झाल्या. मणिपूर हिंसाचारावरून झालेल्या गोंधळामुळे लोकसभेत सुमारे 44 टक्के आणि राज्यसभेत 63 टक्के कामकाज झाले. त्यात एकूण 21 विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. पण आता पुन्हा एकदा पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्यात ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक आणण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. तसेच, लोकसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस जाहीर होण्याची देखील चर्चा आहे.
हेही वाचा – One Nation-One Election : मोदी सरकार आणणार ‘एक देश – एक निवडणूक’ विधेयक, काय आहे फायदे-तोटे
तथापि, ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावण्यात आल्याने, अनेक खासदारांनी, विशेषत: महाराष्ट्रातील खासदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात हा उत्सव भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत असतो. मात्र तरीही, या उत्सव सोडून अधिवेशनाला जावे लागणार आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि त्याच वेळेला नेमके लोकसभेचे अधिवेशन लागले आहे. आता सण-उत्सव सुद्धा साजरे करायचे नाहीत, अशी भूमिकाच हिंदुत्ववादी पक्षांची दिसत आहे. आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत, असे समजू नका म्हणजे नशीब, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.