विमान लँड व्हायच्या आधीच उघडले दरवाजे; थरकाप उडवणारा Video Viral

नवी दिल्ली : दक्षिण कोरिया येथे शुक्रवारी आसियाना एयरलाइन्स एअरबस A321 या विमान उतरत असताना आपत्कालीन दरवाजा उघडल्यानंतर केबिनमध्ये हवा भरायला सुरूवात झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण विमान सुरक्षित उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. विमानामधील एकही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (Doors open before the plane lands)

आशियाना एअरलाइन्सने सांगितले की, विमान आग्नेय शहर डेगूला जात असताना दुपारी १२.४५ च्या सुमारास विमानाचे गेट उघडले. या विमानातून 194 प्रवासी प्रवास करत होते. यातील 40 प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी होते. हे सर्वजण राष्ट्रीय स्पोर्ट्स स्पर्धेसाठी जात होते. ही दुर्घटना घडली त्यावेळी दरवाजा किती वेळ उघडा होता, याचा शोध घेतला जात आहे. परंतु दरवाजा उघडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने काही प्रवासी प्रचंड घाबरले होते. यातील काही प्रवाशांना रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय व्यक्तीने लीवरला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विमानाच्या अटेंडंडने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही, कारण विमान लँड होणार होते. त्यावेळी तो दारूच्या नशेत नसल्यामुळे त्याने असं कृत्य का केलं यावर त्याने कोणतही उत्तर दिलं नाही. त्याने दरवाजा उघडल्यामुळे ही घटना घडली असावी असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस त्याची चौकशी करत आहेत.