घरदेश-विदेशकेजरीवालांवर दुहेरी संकट, दिल्ली वाचवणार की गुजरात गाजवणार?

केजरीवालांवर दुहेरी संकट, दिल्ली वाचवणार की गुजरात गाजवणार?

Subscribe

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. आम्ही दिल्ली महापालिके(MCD)ला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैशांचा भ्रष्टाचार केला

नवी दिल्लीः दोन मोठ्या राज्यांत विधानसभा निवडणुकांदरम्यान महापालिकांच्या निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीबाबत राजकीय प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे आणि यावेळी ते पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपसमोर आम आदमी पार्टीचे कडवे आव्हान आहे. दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा मोठे वक्तव्य केले आहे. ‘एक दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल’, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. आम्ही दिल्ली महापालिके(MCD)ला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैशांचा भ्रष्टाचार केला. हे लोक भरपूर पैसे खातात. लोकांनी थोडे काम केले असते तर कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता, असा टोलाही त्यांनी भाजपवाल्यांना लगावलाय. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी हिमाचल प्रदेशमध्ये अचानक माघार घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरत होता. अरविंद केजरीवालांनी हिमाचल प्रदेशमधील प्रचार का थांबवला, त्यांचा भाजपशी संबंध आहे काय?, मतदानापूर्वी हिमाचलमधून जवळपास गायब झालेल्या आपवर काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. तुम्ही हिमाचल प्रदेशमधून एक्झिट घेण्याचे कारण भाजपला फायदा तर नाही का?, केजरीवाल यांना कोणी विचारावे की त्यांनी हिमाचलमधून अचानक प्रचार का मागे घेतला?, असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केलाय.

- Advertisement -

दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्ली महापालिका निवडणूक आणि गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केलंय. हिमाचलमध्ये मतदान संपले आहे, तर गुजरातमधील विधानसभा निवडणूक आणि दिल्लीत महापालिका-एमसीडी निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे, जी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांना भाजपकडून खेचून आणायची आहे. निवडणुकीत या तिन्ही पक्षांसाठी बरंच काही पणाला लागलं असलं तरी या निवडणुकांच्या निकालांचा सर्वाधिक परिणाम राजकीय पक्षांवर होणार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यावरून दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची जादू कायम राहते की नाही हे पाहायला मिळणार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसोबतच दिल्लीतील महापालिका निवडणुकीने अरविंद केजरीवालांची कोंडी केली आहे. व्यावहारिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करणे हे आपचे मुख्य उद्दिष्ट आहे, जिथे भाजपने दीर्घकाळ सत्ता गाजवली. गुजरातमध्ये ते कसे तरी किमान दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून आगामी गुजरात निवडणुकीत ते स्वतःला एक भाजपसमोर प्रभावी पर्याय म्हणून सादर करू शकतील.

आम आदमी पार्टीसाठी सर्वाधिक महत्त्वाची दिल्ली आहे आणि तिथे त्यांच्यासमोर मोठी आव्हानेही आहेत. ‘आप’चा राजकीय प्रवास हा दिल्लीतूनच सुरू झाला आणि दिल्लीही हाच त्यांचा सर्वात मजबूत बालेकिल्ला आहे. मात्र, विधानसभेत दणदणीत विजय मिळवूनही पक्षाला येथील राजकीय स्थितीनुसार लोकसभा आणि महापालिकेत यश मिळू शकलेले नाही. यावेळी दिल्लीतील महापालिका आप जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचाः अमृत फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण; म्हणाल्या, मराठी बोलण्याच्या ओघात…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -