मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी (26 डिसेंबर) निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. शनिवारी (28 डिसेंबर) डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सध्या मनमोहन सिंग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. शिवाय, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. (dr manmohan singh last journey commence from AICC headquarter after public pay tributes says kc venugopal)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी 8 वाजता दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात ठेवले जाणार आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांना डॉ. मनमोहन सिंग यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानुसार, सकाळी 9:30 वाजता डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातून सुरू होणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली. सध्या मनमोहन सिंग यांचे पार्थिव निवासस्थान ३, मोतीलाल नेहरू रोड येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कामं रद्द करण्यात आली आहेत. शिवाय, कर्नाटकातील बेळगावी येथे होणारी काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेसने रद्द केली आहे. याबाबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी माहिती दिली.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे.
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : मी मार्गदर्शक गमावला; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावूक
Edited By vaibhav patil