(Dr Manmohan Singh) नवी दिल्ली : भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शनिवारी पंचत्वात विलीन झाले. निगमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी मुलगी उपिंदर सिंग यांनी त्यांना मुखाग्नी दिला. डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर अनेक मान्यवरांनी निगमबोध घाटावर उपस्थित राहून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला.
हेही वाचा – Dr Manmohan Singh : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रणव मुखर्जींची कन्या संतापली, म्हणाली…
अंत्यसंस्कारापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांनीही त्यांचे अंतिम दर्शन घेतले. काँग्रेस खासदार सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तिथे सुमारे तासभर मृतदेह येथे ठेवण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेस मुख्यालय ते निगमबोध घाट असा डॉ. मनमोहन सिंग यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. काँग्रेस मुख्यालयापासून सुरू झालेला डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा अकबर रोडवरून इंडिया गेटकडे निघाली. मग इंडिया गेटवरून टिळक मार्गे, आयटीओ लाल दिव्यापासून उजवीकडे वळली. जुन्या पोलीस मुख्यालयासमोरून ही अंतयात्रा निगमबोध घाटावर पोहोचली.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ‘जबतक सूरज चांद रहेगा, मनमोहन आपका नाम रहेगा’, ‘मनमोहन सिंग अमर रहें’ अशा घोषणा देत होते. डॉ. मनमोहन सिंह यांचे पार्थिव ज्या वाहनात ठेवण्यात आले होते, त्या वाहनात राहुल गांधी, मनमोहन सिंह यांचे काही कुटुंबीय तसेच काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते.
हेही वाचा – BJP Vs Congress : डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण, भाजपाचा काँग्रेसवर पलटवार