नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारताचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, आता त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशीच एक आठवण म्हणजे एका पत्रकार परिषदेत त्यांनी एका पत्रकाराला विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी केवळ एका वाक्यात उत्तर देत पत्रकाराला शांत केले होते. (Dr. Manmohan Singh one-sentence reply to a journalist On the issue of being a weak prime minister)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 10 वर्ष भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. परंतु, 2014 मध्ये जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्यानंतर विरोधकांनी विशेषतः भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम आणि CWG घोटाळा यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले होते. त्याचवेळी एका पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांना एका पत्रकाराने त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. भाजपा आणि नरेंद्र मोदी तुम्ही कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप करतात. तुम्हाला तुमच्या पक्षानेच कमकुवत केले आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते अत्यंत शांत बसून होते.
पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर मनमोहन सिंग यांनी काळी सेकंदांकरिता मौन राहणे पसंत केले. पण त्यानंतर त्यांनी केवळ एका वाक्यात अन् शांतपणे उत्तर देत म्हटले की, “मी कमकुवत होतो की नाही हे इतिहासच ठरवेल.” त्यामुळे त्या पत्रकाराला त्यांनी केवळ एका वाक्यात उत्तर देत शांत केले. यानंतर दुसऱ्या पत्रकाराने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, तुमच्याबद्दल असे बोलले जाते की तुमचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही. तुमचे म्हणणे ऐकले जात नाही आणि तुम्ही मौन बाळगता. याही प्रश्नाला अत्यंत शांतपणे उत्तर उत्तर देत त्यांनी म्हटले की, “माझा विश्वास आहे की, सध्याच्या माध्यमांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक दयाळू असेल. मंत्रिमंडळात काय होते ते मी सर्व काही सांगू शकत नाही.”
तर, पंतप्रधान पदी असताना मनमोहन सिंग यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, माझ्या कामाचे मूल्यमापन करताना वेळ अधिक उदार असेल, इतिहास माझ्या कामाचे उदारतेने मूल्यमापण करेल आणि त्यांचे हे वाक्य आज खरे ठपले असून डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यानंतर आता त्यांनी 10 वर्षांपूर्वी जे वक्तव्य केले होते ते प्रत्येकाला त्यांच्या जाण्याची आठवण करून देत आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांनी भारतासाठी दिलेल्या भरीव योगदानाची सर्वजण आठवण कढत आहेत. तर असे कोणतेच क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रातून त्यांच्या निधनाबज्जल हळहळ व्यक्त करण्यात येत नसेल.