Homeदेश-विदेशDr. Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा,...

Dr. Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, शनिवारी होणार अंत्यसंस्कार

Subscribe

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 28 डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना यश न मिळाल्याने गुरुवारी रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आली. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशाने एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. तर त्यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 28 डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Dr. Manmohan Singh passed away Seven days of national mourning announced by Indian Government)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाल्यानंतर देश-विदेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करण्यात आला. तर आज शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एम्समध्ये निधन झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराबाबत काही महत्त्वाचे काय प्रोटोकॉल आहेत, त्यानुसारच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय देशात 01 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजेच सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Dr. Manmohan Singh : चलनी नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव पंतप्रधान, कारण…

केंद्राने राष्ट्रीय दुखवट्याची माहिती एका पत्राद्वारे जाहीर केली. राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अनेक राज्यांतील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याने आज सुटी जाहीर केली. तसेच, तेलंगणा राज्यातही सुटी जाहीर करण्यात आली आहे. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालय आणि शाळांना सुटी दिली आहे. कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यातील सरकारी कार्यालये आणि बँकांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत.

- Advertisement -

शनिवारी होणार अंत्यसंस्कार…

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी, 28 डिसेंबरला शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मारक स्थळांवर केले जातात. माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार सहसा दिल्लीत होतात. काही वेळा अंत्यसंस्कार गृहराज्यातही होऊ शकतात. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव उद्या शनिवारी, 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल, जिथे लोक त्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार येतील, अशी माहिती आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -