Homeदेश-विदेशDr Manmohan Singh : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रणव मुखर्जींची कन्या संतापली, म्हणाली...

Dr Manmohan Singh : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रणव मुखर्जींची कन्या संतापली, म्हणाली…

Subscribe

जेव्हा माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन झाले तेव्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती आणि शोकसंदेश प्रणव मुखर्जी यांनीच तयार केला होता, हे मी माझ्या वडिलांच्या डायरीत वाचले होते, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे.

(Dr Manmohan Singh) नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वतंत्र स्मारक उभारण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तथापि, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी याबाबत जोरदार टीका केली आहे. 2020मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचा (प्रणव मुखर्जी) मृत्यू झाला तेव्हा काँग्रेस नेतृत्वाने शोकसभादेखील आयोजित केली नव्हती किंवा काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक बोलावली नाही. उलट याबाबत काँग्रेस नेतृत्वाने आपली दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. (Pranab Mukherjee’s daughter is angry at Congress’s duplicity)

डॉ. मनमोहन सिंग यांचे 27 डिसेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्याचे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना सांगितले होते की, भारताच्या राष्ट्रपतींसाठी शोकसभा आयोजित केली जात नाही. पण हे पूर्णपणे तथ्यहीन आणि निराधार आहे. जेव्हा माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन झाले तेव्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती आणि शोकसंदेश प्रणव मुखर्जी यांनीच तयार केला होता, हे मी माझ्या वडिलांच्या डायरीत वाचले होते, असे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Dr Manmohan Singh : जुमलेबाजी न करताही देशाचे नेतृत्व करता येते…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

याशिवाय, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सी. आर. केसवन यांच्या ‘X’वरील एका पोस्टचा हवाला दिला आहे. काँग्रेसने गांधी कुटुंबाचे सदस्य नसलेल्या इतर ने्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा सी. आर. केसवन यांनी केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले डॉ. संजय बारू यांच्या ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाचाही उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस नेतृत्वाने 2004मध्ये निधन झालेले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे दिल्लीत कोणतेही स्मारक उभारलेले नाही. उलट, काँग्रेसने नरसिंह राव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीऐवजी हैदराबादमध्ये करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे, असे केसवन यांनी म्हटले आहे. (Dr Manmohan Singh: Pranab Mukherjee’s daughter is angry at Congress’s duplicity)

हेही वाचा – Dr. Manmohan Singh : 10 वर्ष पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंगांनी किती वेळा घेतली होती पत्रकार परिषद?


Edited by Manoj S. Joshi