Dress code : मथुरेतील ‘या’ मंदिरात तोकडे कपडे घालण्यास मनाई

लखनऊ : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेसकोड (Dress code) लागू करण्यात आला होता. पण चौफेर टीकेनंतर तो मागे घेण्यात आला आता मथुरेच्या वृंदावनातील सात मंदिरांमध्ये (Vrindavan temple) असलेल्या ठाकूर राधा दामोदर मंदिरात (Thakur Radha Damodar Temple) दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे.

महिला आणि पुरुषांनी तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये, असा बोर्ड ठाकूर राधा दामोदर मंदिराच्या गेटवर लावण्यात आला आहे. सेवेकरी पूर्णचंद गोस्वामी यांनी इतर मंदिर व्यवस्थापनांनाही असे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना मनाई करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या संस्कृतीत आणि शास्त्रात असे कपडे घालून मंदिरात येण्यास मनाई आहे, असे त्यांनी सांगितले. साधे कपडे घालून मंदिरात येण्याचे आवाहन देशाच्या विविध भागातून केले जात आहे. बांके बिहारी मंदिराच्या व्यवस्थापकाने देखील, धार्मिक स्थळी तोकडे कपडे घालून येऊ नये; मंदिराची परंपरा जपली पाहिजे, असे म्हटले आहे.

लोकांनी धार्मिक स्थळांवर असभ्य कपडे परिधान करू नयेत. हे सनातन संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात आहे. एरवी त्यांनी काय परिधान करायचे, हे ठरवायला मोकळे आहेत, असे पंचायती मंदिर ठा. राधारमण लालचे पदाधिकारी अनुभूती गोस्वामी यांनी सांगितले. ठा. राधावल्लभ मंदिराचे सेवेकरी मुकेश वल्लभ गोस्वामी यांनी या आवाहनाचे समर्थन केले आहे. हे सर्वच मंदिरांमध्ये व्हायला हवे. मंदिराते येण्यासाठी एक वेशभूषा आहे. पण इथे असभ्यता पसरवली जात आहे आणि ती थांबवली पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ‘मी राजीनामा देतो, पण…’ आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिआव्हान