चहाप्रेमींनो, कागदी ग्लासमधून चहा पिताय तर सावधान!

drinking tea in paper cups not safe, find iit kharagpur study
चहाप्रेमींनो, कागदी ग्लासमधून चहा पिताय तर सावधान!

दररोजच्या धावपळीत थोडी रिफ्रेशमेंट घेण्यासाठी आपण चहा पितो. घरी असल्यामुळे आपण चहा कपातून किंवा स्टीलच्या वाटीतून पितो. पण बाहेर असल्यावर आपण काही वेळेला कागदी ग्लासातून चहा पितो. आता तर अनेक कार्यक्रमात देखील कागदी ग्लासचा वापर करून चहा दिला जातो. प्लास्टिक ग्लास आरोग्यासाठी धोकादायक असतो म्हणून आपण कागदी ग्लासात चहा पिण्यास सुरुवात केली. पण आता कागदी ग्लासमधून चहा पिणे आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याचे समोर येत आहे. एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे.

आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी एका संशोधनाच्या माध्यमातून असा दावा केला आहे. या संशोधनानुसार, ‘जर एखादा व्यक्ती रोज कागदी ग्लासमधून तीन वेळा चहा पितो, तर तो ७५ हजार छोटे सूक्ष्म प्लास्टिक कण गिळतो.’ टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ‘या कागदी ग्लाससाठी सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर खतरनाक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे यामधून गरम पदार्थ दिल्याने त्या पदार्थात दूषित कण मिसळतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.’

कागदी ग्लासमध्ये हायड्रोफोबिक फिल्मचा पातळ थर असतो जो अनेक प्लास्टिक आणि कधीकधी सह-पॉलिमरचा असतो. या संशोधनात सिव्हिल इंजिनिअर विभागाचे संशोधक आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. सुधा गोयल यांनी इतर संशोधकांसह सांगितले की, ‘१५ मिनिटांत हे सूक्ष्म-प्लास्टिक थर गरम पाण्यात वितळते.’

संशोधकांनी या संशोधनासाठी दोन वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या. त्यामधून हे समोर आले आहे. तसेच या संशोधनात असे देखील म्हटले आहे की, ‘सूक्ष्म-प्लास्टिक आयन विषारी भारी धातूंमध्ये समान वाहक म्हणून कार्य करू शकतात. जेव्हा ते मानवी शरीरापर्यंत पोहोचतात तेव्हा आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.’


हेही वाचा – अमेरिकेतील ‘या’ शहरात कुत्रा झाला महापौर!