मोठी बातमी! द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजयी

Draupadi Murmu

द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना ७१.२९ टक्के मते मिळाली. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीचा कौल हाती आला असून द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली आहे. (Druapadi Murmu new president of India)

२४ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. तर, आज २१ जुलै रोजी सकाळपासून निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. आता अखेर निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत एनडीएने आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती. तर, युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. या दोघांची उमेदवारी जाहीर होताच द्रौपदी मुर्मू ही निवडणूक जिंकणार असं म्हटलं जात होतं. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. अखेर, द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून त्यांच्या रुपाने आदिवासी समाजाला राष्ट्रपती पदावर बसण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा – दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

पहिल्या फेरीत खासदारांच्या मतांची मोजणी झाली. एकूण वैध मतांपैकी ३,७८,००० मूल्यांसह ५४० मते द्रौपदी मुर्मू यांना तर, १,४५,६०० मूल्यांसह २०८ मते विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली. १५ मते अवैध ठरली, अशी माहिती राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यात दहा राज्यांमध्ये मतमोजणी झाली. कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मनिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिसा आणि पंजाब या राज्यात एकूण १ लाख ६५ हजार ६६४ मतमूल्यांची १ हजार ३३३ मते होती. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते मिळाली. तर, यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली.

एकूण ३२१९ मतांपैकी २१६१ मते द्रौपदी मुर्मूंना मिळाली. तर, यशवंत सिन्हांना १०५८ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांचे मूल्य अनुक्रमे ५ लाख ७७ हजार ७७७ आणि २ लाख ६१ हजार ६२ आहे.

दरम्यान, १७ खासदारांनी क्रॉस व्होटिंग करत द्रौपदी मुर्मूंसाठी मतदान केले आहे.