मुंबई पोलिसांची भरुचमध्ये धडक कारवाई; एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, सातजणांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

अंमलपदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने भरुचमधील अंकलेश्वर परिसरातील एका फॅक्टरीवर पोलिसांनी छापा टाकाला. तेथून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत एक हजार 26 कोटी रुपये आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी विभागाने गेल्या 15 दिवसांत केलेली ही मोठी कारवाई आहे. याआधी पोलिसांनी नालासोपाऱ्यात छापा टाकला होता. या कारवाईत 703 किलो वजानाचे एमडी जप्त करण्यात आले. व त्याची किंमत सुमारे 1400 कोटी रुपये होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.

नालासोपाऱ्यात एमडी बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीने नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर येथे छापा टाकला. तेव्हा तिथे एमडी तयार करण्याचा कारखाना आढळला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचपैकी चौघांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. तर, या कारवाई दरम्यान नालासोपाऱ्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली होती.