उत्तर प्रदेशात दुर्गापूजा मंडपाला भीषण आग; 2 बालकांसह चौघांचा मृत्यू, 64 भाविक जखमी

china henan province anyang city factory cought fire 36 killed and many injured

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या भदोहीनजीक नर्थुआ येथील एकता दुर्गा पूजा मंडपात रविवारी रात्री 8च्या सुमारास आरती सुरू असताना भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन बालकांसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला तर, 64हून अधिक जखमी झाले असल्याचे स्थानिक तसेच प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

औरई-भदोही मार्गावरील नर्थुआ येथे असलेल्या एकता क्लबचा मंडप लोकप्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात येथे गर्दी होत असते. रविवारी रात्री आठच्या सुमारास मंडपात आरती सुरू होती आणि त्यात दीडशेहून अधिक भाविक सहभागी झाले होते. मंडपात डिजिटल शोही सुरू होता. याचदरम्यान मंडपाला अचानक आग लागली आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आगीपासून जीव वाचविण्यासाठी भाविकांची पळापळ सुरू झाली. काही वेळातच संपूर्ण मंडपाने पेट घेतला. घटनास्थळी आरडाओरडा झाला. जीव वाचविण्यासाठी प्रत्येक जण जो मार्ग सापडेल तिथून पळत होता.

दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबरच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी गौरांग राठी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अनिल कुमार घटनास्थळी बचावकार्यावर लक्ष ठेवूनहोते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत अंकुश सोनी (12) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला असून 64हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

वाराणसीच्या विभागीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाने 12 वर्षांच्या मुलासह केवळ दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त असून त्यांना कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून 37 जणांना वाराणसीला रेफर करण्यात आले. यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून दर्घटनेची माहिती घेतली आणि जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करण्यास सांगितले. दुर्घटनेच्या चौकशीसाठी पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. घटनेचे कारण आणि निष्काळजीपणाच्या आरोपांची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.