E-Shram Portal: मोदी सरकार ३८ कोटी लोकांना देणार मोठी भेट; वाचा सविस्तर

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील करोडो कामगारांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. ही भेट म्हणजे करोडो कामगारांसाठी मोदी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ३८ कोटी कामगारांना फायदा होणार आहे. यामध्ये बांधकाम कर्मचाऱ्यांशिवाय प्रवासी कर्मचारी, घरेलू कामगार यांचाही समावेश आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील कामगारांचा डेटाबेस राष्ट्रीय स्तरावर तयार केला जाणार असून जेणेकरून या मजुरांना त्यांच्या क्षमतेनुसार योजनेत समाविष्ट करता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील साधारण ३८ कोटी मजुरांसाठी १२ अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करणार आहे, जे देशभरात वैध असणार आहे. ई-श्रम कार्ड देशातील करोडो असंघटित कामगारांना नवी ओळख देईल. हे लेबर कार्ड त्यांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास देखील फायदेशीर ठरणार आहे. बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावर विक्रेते या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.

डेटाबेस लाँच केल्यानंतर कामगारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यांना त्यांचे नाव, व्यवसाय, पत्ता, व्यवसायाचा प्रकार, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती इत्यादी पूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. स्थलांतरित मजूर त्यांच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रावर (CSC) नोंदणी करू शकतात. ज्या मजुरांकडे फोन नाहीत किंवा ज्यांना वाचायला/लिहायला येत नाही ते CSC केंद्रांवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. कामगाराच्या खाते क्रमांकासाठी नोंदणी कार्ड तयार केले जाईल, ज्याला ई श्रम कार्ड असे नाव देण्यात आले आहे. असंघटित आणि स्थलांतरित कामगारांचा डेटाबेस आधारशी जोडला जाणार आहे.


मी स्वतःच अडचणीत, प्रताप सरनाईक यांची अनिल परब विरोधातील कारवाईवर प्रतिक्रिया