S Jaishankar on Rahul Gandhi : नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केंद्र सरकारवार जोरदार हल्लाबोल केला. भारताची उत्पादन क्षमता कमी आहे. आणि त्यामुळेच आपल्या पंतप्रधानांना आमंत्रण आणण्यासाठी थेट अमेरिका गाठावी लागते, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री तसेच भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. तर त्यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. (eam s jaishankar slammed rahul gandhi over usa tour remark in lok sabha)
राहुल गांधी यांनी आरोप केला की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले नव्हते. राहुल गांधी यांच्या या सर्व आरोपांना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी यांनी केलेले विधान हे खोटे आहे. आपल्या विधानांनी ते नेहमीच देशाचे नुकसान करत असतात.
एस. जयशंकर यांची समाज माध्यमावर पोस्ट
एस. जयशंकर यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर म्हणून X या समाज माध्यमावर एक पोस्ट देखील केली आहे. डॉ. जयशंकर म्हणतात, डिसेंबर 2024 मध्ये मी केलेल्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी यांनी जाणूनबुजून खोटे सांगितले आहे. बायडेन प्रशासनातील परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटायला गेलो होतो. यासोबतच एका बैठकीचे अध्यक्षत्व मला करायचे होते. यातील कोणत्याही भेटीत आम्ही पंतप्रधानांच्या आमंत्रणाबाबत चर्चा केली नाही. खरं तर हे अगदी सामान्य ज्ञान आहे की, अशा कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान कधीच सहभागी होत नाहीत. भारताचे प्रतिनिधित्व सामान्यपणे विशेष दूत करतात, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी नेहमीच अशाप्रकारची टिप्पण्या करून परदेशात भारताची प्रतिमा मलीन करत असतात, असा आरोप डॉ. जयशंकर यांनी केला आहे. अशाप्रकारे खोटं बोलण्याचा राहुल गांधी यांचा उद्देश हा राजकीय असू शकतो पण, यामुळे परदेशात देशाची प्रतिमा डागाळली जाते, असंही ते म्हणाले आहेत.
Leader of Opposition Rahul Gandhi deliberately spoke a falsehood about my visit to the US in December 2024.
I went to meet the Secretary of State and NSA of the Biden Administration. Also to chair a gathering of our Consuls General. During my stay, the incoming NSA-designate met…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 3, 2025
राहुल गांधी यांच्या या विधानानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वात भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. तसेच, देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधी असे कोणतेही विधान राहुल गांधी देऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. तसेच आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ ठोस पुरावे राहुल गांधी यांनी द्यावेत, असे आवाहनही रिजिजू यांनी केले आहे.