नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात तुर्कस्तानात मोठा भूकंप झाला होता. ज्यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आजही तिथे अनेकदा भूकंप होत आहेत. पण आज पहाटे उत्तर आफ्रिकेतील मोरक्को देश भूकंपाने हादरल्याची माहिती समोर आली आहे. या देशात भूकंपाने हाहाकार माजवला असून आत्तापर्यंत या भूकंपात तब्बल 296 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Earthquake: 296 people died due to earthquake in Morocco)
हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन – पंतप्रधान मोदींमध्ये बैठक; ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा
मोरक्कोमध्ये आज पहाटेच्यावेळी लोक गाढ झोपेत असताना भूकंपाचा धक्का बसला. मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपाचा हा धक्का 6.8 रिश्टर स्केल इतका होता. ज्यानंतर मोरक्कोमधील अनेक इमारती या पत्त्यासारख्या कोसळल्या. ज्यानंतर तत्काळ मोरक्को प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या माराकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, माराकेशपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी मोरक्कोमध्ये विध्वंसक असा भूकंप झाला. तर उत्तर आफ्रिकेत झालेला हा भूकंप गेल्या 120 वर्षांतील सर्वांत भयंकर आणि शक्तीशाली असा भूकंप असल्याची माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेकडून देण्यात आली आहे. तसेच, 1900 पासून या भागातील 500 किमी परिसरात M6 किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम-5 पातळीचे केवळ 9 भूकंप नोंदवले गेले आहेत. परंतु हा आजपर्यंतचा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगण्यात आले आहे.
अचानक झालेल्या या भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लोक घाबरले आहेत आणि पुन्हा भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले आहेत, अशी माहिती येथील स्थानिक नागरिकाकडून देण्यात आली आहे. भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. प्रशासनासह नागरिकांनीही कोसळलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचे काम सुरू केले असून स्थानिक नागरिक देखील प्रशासनाची मदत करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचविण्याचे काम करत आहेत. शहरातील प्रसिद्ध लाल भिंतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एका भागात मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग कोसळून त्याचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे.
नवी दिल्लीत सध्या सर्व देशांच्या प्रमुखांची G20 बैठक सुरू आहे. या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेचे ट्वीट देखील मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.” असे पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आले आहे.