नवी दिल्ली : आज मंगळवारची (ता. 07 जानेवारी) सुरुवात नेपाळ, तिबेट आणि भारतातील उत्तरेच्या काही राज्यांमध्ये भूकंपाच्या धक्क्याने झाली आहे. यामध्ये या भूकंपाचा सर्वाधिक फटका हा तिबेट या देशाला बसला असून यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 62 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तिबेटमधील शिजांग शहरातील डिंगरी काउंटीमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू 28.5 अंश उत्तर अक्षांश आणि 87.45 अंश पूर्व रेखांशावर 10 किलोमीटर खोलीवर होता. (Earthquake in Tibet 53 dead, 62 injured)
चीनमधील सरकारी मीडियानुसार दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमधील शिजांग शहरातील डिंगरी काउंटीमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपात आतापर्यंत 53 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, मंगळवारी सकाळपासूनच तिबेटच्या शिजांगमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. येथे सकाळी 6.30 वाजता 10 किमी खोलीवर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 07 वाजून 02 मिनिटांनी 4.7 रिश्टर स्केलचे भूकंप झाला. तर 07.07 वाजता 4.9 रिश्टर स्केल आणि 7.13 वाजता 5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. म्हणजेच साधारणतः पाऊण तासामध्ये या देशात एकूण चार मोठे भूकंप झाले आहेत. या भूकंपामुळे घाबरलेल्या नागरिकांनी मोकळ्या जागेत येऊन आपला जीव वाचवला.
हेही वाचा… Earthquake : नेपाळ, तिबेटसह भारतात भूकंपाचे धक्के; अर्ध्या तासाच्या फरकाने बसले मोठे हादरे
तिबेटमध्ये झालेल्या या भूकंपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये तिबेटमधील एका चौकातील शिल्प हे पत्त्यासारख्या कोसळले. तर, काही भागात इमारती आणि घरे ही पत्त्यासारखी कोसळली आहेत. ज्यामुळे तिबेटमध्ये मोठ्या वित्तहानीसोबतच जीवितहानी सुद्धा झाली आहे. या भूकंपांनंतर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर, भारतातील अनेक राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याचा सर्वाधिक फटका बिहारला बसला. याशिवाय आसाम, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले. यूएसजीएस भूकंपशास्त्रानुसार, भूकंपाचे केंद्र लोबुचेच्या 93 किमी ईशान्येकडे होते.