नवी दिल्ली : आज मंगळवारची (ता. 07 जानेवारी) सुरुवात नेपाळ, तिबेट आणि भारतातील उत्तरेच्या काही राज्यांमध्ये भूकंपाच्या धक्क्याने झाली आहे. एकाच वेळी काही मिनिटांच्या फरकाने तिन्ही देशाला भूकंपाचे हादरे बसले आहेत. भारतामध्ये दिल्ली, बिहार, सिक्कीम, उत्तर बंगालसह आणखी काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 7.1 एवढी मोजण्यात आली. तर तिबेटमध्ये या भूकंपाची तीव्रता 6.8 एवढी मोजण्यात आली. (Earthquakes in India including Nepal and Tibet)
भारतामध्ये बिहारमधील मोतिहारी आणि समस्तीपूरसह अनेक भागात सकाळी 6.40 वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपाच पाच सेकंदांपर्यंत भूकंपाचे हे झटके जाणवले. सुदैवाने तिन्ही देशांमध्ये झालेल्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु, दिल्ली, नोएडा, गाझियाबादसह एनसीआरमधील लोकांमध्ये भूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांची झोप उडाली. घाबरूल लोक घराबाहेर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी होती की त्याचे धक्के उत्तर भारतातील काही भागांमध्ये जाणवले. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली हरियणासह इथर राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
हेही वाचा… HMPV in Nagpur : नागपुरातून महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
नवीन वर्षाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2 आणि 3 जानेवारीला भूकंपाचे धक्के जाणवले होते. 02 जानेवारी 2025 रोजी सिंधुपालचौक जिल्ह्यात 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 03 जानेवारी 2025 रोजी कर्नाली प्रांतातील मुगु जिल्ह्यात 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पृथ्वीमध्ये सात टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट एकमेकांवर आदळतात, घासल्या जातात. तसेच एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा जमीन हलायला लागते. त्यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाची तीव्रता मापण्यासाठी रिक्टर या परिमाणाचा वापर केला जातो. त्याला रिक्टर मॅग्निट्युट स्केल असे म्हणतात.