घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना जाईना, तितक्यात इबोला पुन्हा आला! कांगोमधून साथीला सुरुवात!

कोरोना जाईना, तितक्यात इबोला पुन्हा आला! कांगोमधून साथीला सुरुवात!

Subscribe

जगभरात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ लाखाहून जास्त लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर ५० लाखाहून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही कोरोनावर लस सापडलेली नसताना आता आणखीन एक मोठं संकट जगासमोर आ वासून उभं राहिलं आहे. कोरोनाइतकाच जीवघेणा असलेला इबोला व्हायरस पुन्हा एकदा उभा ठाकला आहे. आफ्रिका खंडातल्या कांगो या देशामध्ये इबोलाचे एकूण ६ रुग्ण आढळले असून त्यातल्या चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने देखील याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे कोरोनासोबतच आता इबोलाशीही कांगोवासियांना दोन हात करावे लागणार आहेत.

लस आहे, पण…

२०१८नंतर दुसऱ्यांदा कांगोमध्ये इबोलाचा व्हायरस सापडला आहे. याआधी ज्या ज्या देशांमध्ये इबोलाचे रुग्ण सापडले, तिथे काही प्रमाणात मृत्यू झाल्याचं दिसून आलं आहे. भारतात देखील काही वर्षांपूर्वी केरळमध्ये इबोलाची साथ पसरली होती. सुदैवाने इबोलाची लस सापडली असून rVSV-ZEBOV अर्थात Ervebo असं या लसीचं नाव आहे. काळजीची बाब फक्त इतकीच आहे की ही लस इबोलाच्या झैरे (Zaire ebolavirus) याच प्रजातीवर प्रभावी ठरते. त्यामुळे इबोलाच्या इतर प्रजातींचा प्रादुर्भाव वाढल्यास कोरोनासोबतच इबोलाही जगासाठी डोकेदुखी ठरू शकेल.

- Advertisement -

कांगोमधलं बंदराचं शहर असलेल्या मबंडाकामध्ये इबोलाचे हे रुग्ण सापडले आहेत. या बंदरांमधून अनेक ठिकाणी सागरी मार्गाने वाहतूक सुरू असते. त्यामुळे इथून तो इतर ठिकाणी देखील पसरण्याचा धोका आहे. १९७६मध्ये इबोलाचा व्हायरस पहिल्यांदा कांगोमध्ये सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल १८ वेळा कांगोमध्ये इबोला व्हायरसची साथ आली आहे. मबंडाका कांगोची राजधानी किन्हासापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, सागरी मार्गाने देखील किन्हासा जोडलं गेलं आहे. किन्हासाची लोकसंख्या १ कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे तिथे इबोलाचा फैलाव झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

काय आहेत इबोलाची लक्षणं?

इबोला हा प्रामुख्याने उष्ण कटिबंधात सापडणारा विषाणू आहे. अचानक ताप येणं, अशक्तपणा येणं, स्नायू दुखणं, गळ्यात खवखव जाणवणं अशी प्राथमिक लक्षणं इबोलाची लागण झाल्यावर आढळतात. त्यानंतर मात्र उलटी होणं, डायरिया, शरीरांतर्गत किंवा बाहेरही रक्तस्त्राव होणं अशी गंभीर लक्षणं दिसतात. रक्तस्त्राव वाढल्यावर रुग्णाचा मृत्यू होतो. रुग्णाच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या एका पदार्थाच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस माणसापासून माणसाकडे पसरतो. पण त्याची सुरुवात वटवाघुळांपासून होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -