बाराव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली, अमित शाहांचे काँग्रेसवर टीकास्त्र

अहमदाबाद : भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील 11वी मोठी अर्थव्यवस्था होती. काँग्रेसच्या राजवटीत ती 12व्या स्थानावर घसरली. अटलबिहारी वाजपेयी सत्तेवर आल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा 11व्या स्थानी आली. तर, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ती पाचव्या क्रमांकावर आणली, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी काँग्रेसवर शरसंधान केले. देशातील नागरिकांच्या ऐकल्याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला जात नाही, अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

साणंद येथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी 350 खाटांच्या ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाची पायाभरणी केली. या रुग्णालयात ओपीडी, अंतर्गत सुविधा, एक्स-रे, रेडिओलॉजी, प्रयोगशाळा, ऑपरेशन थिएटर, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ सुविधा, आयसीयू आणि अल्ट्रासाऊंडसह इतर आधुनिक सुविधा असतील. 9.5 एकरावरील रुग्णालयाच्या बांधकामासाठी 500 कोटी रुपये खर्च येईल. ते लवकरच आवश्यकतेनुसार 500 खाटांच्या रुग्णालयात अद्ययावत केले जाऊ शकते.

गुजराती आणि हिंदी भाषेत भाषण करताना त्यांनी 2014नंतर देशात वाढलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या सांगितली. आरोग्य पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांच्या त्रिस्तरीय सर्वांगीण दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्यामध्ये वैद्यकीय विज्ञान पायाभूत सुविधांचा विस्तार आणि मनुष्यबळ; आयुष सारख्या पारंपरिक भारतीय औषधांना मुख्य प्रवाहात आणणे; आणि तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तज्ज्ञांची उपलब्धता वाढवणे यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याची आखणी केली होती. गुजरातमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाचा (आप) आहे. आपचा भर प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षण यावर आहे. हेच ध्यानी घेऊन अमित शाह यांनी वैद्यकीय महाविद्यालयांचा मुद्दा उपस्थित केला, असे सांगितले जाते.

केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले की, राज्य आणि प्रशासनाच्या सहकार्याने परिणाम प्रभावीपणे साध्य करणे शक्य आहे. 500 खाटांचे रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालयांपैकी एक असेल ज्यामध्ये केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर परिसरातील सर्व ग्रामस्थांनाही उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. कोणतीही व्यक्ती आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही, असेही ते म्हणाले.