मनी लाँड्रिंगप्रकरणी आज पुन्हा जॅकलिन फर्नांडिसची ईडी चौकशी

दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यात तिहार तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत दिल्लीबाहेरील तुरुंगात हलवण्याची मागणी केली होती.

ED questions actress Jacqueline Fernandez in money laundering case
मनी लाँड्रिंगप्रकरणी आज पुन्हा जॅकलिन फर्नांडिसची ईडी चौकशी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. आज पुन्हा सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली. या प्रकरणात ईडीने यापूर्वीही अभिनेत्रीची अनेकदा चौकशी करत जबाब नोंदवले आहेत. यावेळी ईडीने आपल्या आरोपपत्रात मोठे खुलासेही केले आहेत. पण ईडीला अद्यापही योग्य उत्तरे मिळू शकलेली नाही. यासाठीच आज पुन्हा ईडीने जॅकलीन फर्नांडिसला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये जॅकलिनची चौकशी सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनविरोधात लुकआउट नोटीसही जारी केली होती. मात्र न्यायालयाने जॅकलिनविरोधातील या लुकआउट नोटीस स्थगित दिली. त्यानुसार जॅकलीनला 31 मे ते 6 जून दरम्यान अबुधाबी येथील आयफा पुरस्कार सोहळ्यात जाण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती.

ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपाबाबत जॅकलीनची ईडी चौकशी सुरू आहे. तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला महागडे गिफ्ट दिल्याचा आरोप आहे. त्याच्यावर कारवाई करत ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत जॅकलीनची 7 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली, जी आरोपी सुकेशने तिला भेट म्हणून दिली होती.

ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने जॅकलिनला भेटायला लावले होते. पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती, असा आरोप आहे. यात सुकेश चंद्रशेखरवर दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून खंडणी उकळण्याचा आणि जॅकलीन फर्नांडिसला कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू पाठवल्याचा आरोप आहे.

सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात

दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यात तिहार तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत दिल्लीबाहेरील तुरुंगात हलवण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर 23 मे पासून उपोषणाला बसला होता. तुरुंगाच्या नियमांच्या विरोधात जाऊन त्याने महिन्यातून दोनदा पत्नी लीना मारिया पॉलला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र आरोपी सुकेशची पत्नी लीना देखील तिहार तुरुंगातच बंद आहे. मात्र या प्रकरणात आता आरोपीच्या अभिनेत्रीसोबत असलेल्या संबंधांमुळे तिला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.


हा शिवसेनेच्या दोन गटांतील अतिशय अंतर्गत विषय – चंद्रकांत पाटील