काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच ‘या’ नेत्यांच्या घरांवर ईडीची छापेमारी

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील नवा रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यातील १२ हून अधिक काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील नवा रायपूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्यातील १२ हून अधिक काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत.

ईडीचे पथक पहाटे पाच वाजल्यापासून रायपूरमधील अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या घरे आणि कार्यालयात पोहोचले आहे. सध्या कागदपत्रांची छाननी केली जात असून तपास केला जात आहे. (ED Raids In Chhattisgarh Team Raids At More Than 12 Congress Leaders House)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडचे राज्यमंत्री सनी अग्रवाल यांच्या टिकरापारा येथील निवासस्थानावर कारवाई सुरू आहे. तसेच, काँग्रेस नेते विनोद तिवारी यांच्या निवासस्थानावर, मोवा आणि दडसेना यांच्या अवंती विहार येथील निवासस्थानावर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय काँग्रेस नेते आरपी सिंह, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव यांच्या दोन्ही घरांवर ईडीने छापे टाकले आहेत.

ईडीने आमदारांच्या सेक्टर-5मधील घर आणि गृहनिर्माण मंडळावरही छापे टाकले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचे महाअधिवेशन होणार आहे. याआधी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या घरांवर ईडीचे मोठ्या प्रमाणावर छापे पडल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, ‘अदानींचा गैरव्यवहार उघड झाल्याने व भारत जोडो यात्रेच्या यशामुळे निराश झालेला भाजपा या कारवाईतून जनतेचे लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न करत आहे. छत्तीसगड काँग्रेस सध्या ईडीचे कार्यालय घेरण्याची तयारी करत आहे’, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.


हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा