NSE फोन टॅपिंग प्रकरणी संजय पाडेंना ईडीचा समन्स; आज चौकशीला राहण्याचे आदेश

ED summons ex-Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in NSE co location case

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत दिवसेंगदिवस वाढ होत आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत, यानंतर पांडेंना ईडीकडून चौकशीसाठी दुसरा समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार ईडीने आज त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजारा (एनएसई)च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने गुरुवारी अटक केली.

चित्रा यांना अटकेनंतर न्यायालयाने 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे, तर याचप्रकरणी ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह एनएसईच्या माजी अधिकार्‍यांविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासादरम्यान आरोपींची संख्या वाढत आहे. संजय पांडे यांच्यासह एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध एनएसई अधिकाऱ्यांचे फोन टॅप करणे आणि इतर अनियमितता केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ईडीने या सगळ्यांविरोधात पीएमएलए अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तर सीबीआयनेही गेल्या आठवड्यात याप्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, नारायण आणि रामकृष्ण यांनी मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या एका कंपनीला शेअर बाजारातील कर्मचार्‍यांचे फोन कॉल बेकायदेशीररित्या टॅप करण्याचे काम दिले होते.

एनएसईचे काही कर्मचारी गोपनीय माहिती बाहेर देत होते, असा संशय चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांना होता. त्यामुळे त्यांनी २००९ ते २०१७ या सालापर्यंत संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला एनएसईच्या सॉफ्टवेअरशी संबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती, असा दावा ईडीतर्फे करण्यात आला आहे.

1986 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा आयपीएस अधिकारी संजय पांडे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून चार महिन्यांच्या कारकिर्दीपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले.

हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरण,  NSE च्या चित्रा रामकृष्ण यांना अटक, संजय पांडेविरोधातही ईडीकडून गुन्हा दाखल

यापूर्वी 5 जुलै रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे NSE फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. NSE फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय पांडे यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यकाळ बराच वादात सापडला होता. ३० जून रोजी ते निवृत्त झाले. यानंतर तीन दिवसांनी त्यांना ईडीने समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले.

नेमके प्रकरण काय?

सीबीआयच्या दाव्यानुसार, 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. त्यावेळी एका आयटी कंपनीला एनएसईची सुरक्षा ऑडिट आणि लीगल कन्सल्टन्सीसाठी काम देण्यात आले होते. ही आयटी कंपनी संजय पांडे यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. ही कंपनी संजय पांडे यांनी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता, त्यानंतर सुरू केली होती.

हेही वाचा – CBIकडून संजय पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, घरावर छापे

मात्र, त्यावेळी राजीनामा मंजूर न झाल्याने त्यांना पुन्हा भारतीय पोलीस सेवेत दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर या कंपनीची मालकी हक्क पांडे यांच्या कुटुंबीयांकडे होती. याच कंपनीच्या माध्यमातून चित्रा रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून एनएसईमधील मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याची माहिती तपासात समोर आली. याचप्रकरणी त्यांच्या विरोधात सीबीआयने 3 गुन्हे दाखल केले असून ईडीनेही 2 गुन्हे दाखल केले आहेत.

फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे. या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅंपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. त्या फोन टॅपिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पुरावे तपासात सीबीआय आणि ईडीला मिळाले. विशेष म्हणजे संजय पांडे यांच्या कंपनीला NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात 4 कोटी 45 लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.


ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची चिन्हे! मतदानाच्या दुसऱ्या फेरीतही आघाडीवर