Edible : खाद्यतेलात लिटरमागे मोठी दरकपात, दोन गोष्टी ठरल्या कारणीभूत

india modi government considers edible oil mustard oil import tax cut to lower prices

सततच्या महागाईची झळ सहन करणाऱ्या ग्राहकांना एक दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने देशातील रिटेल मार्केटमध्ये खाद्य तेलाच्या किंमतीत (Edible oil price) किलोमागे २० रूपयांची मोठी घट झाल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती अधिक असल्या तरीही सरकारने केलेल्या हस्तक्षेपामुळेच तेलाची किंमत कमी झाल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता एक किलो तेलाची किंमत अधिक दिसत असली तरीही ऑक्टोबर महिन्यापासून तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याची माहिती सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण विभागाच्या माहितीनुसार देशातील १६७ कलेक्शन सेंटरच्या ट्रेंडनुसार देशातील प्रमुख रिटेल मार्केटमध्ये खाद्यतेलाची किंमत ही ५ रूपये ते २० रूपयांनी घटली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकड्यानुसार शेंगदाणा तेलाला १८० रूपये प्रति किलोग्रॅम इतका भाव सध्या आहे. तर सरसोचे तेल १८४.५९ रूपये प्रति किलोग्राम, सोया तेल १४८.८५ रूपये प्रति किलोग्रॅम, सुर्यफुल तेल १६२.४ प्रति किलोग्रॅम आणि पामतेल १२८.५ रूपये प्रति किलोग्रॅम इतका दर घसरला आहे.

कोणत्या कंपन्यांची खाद्यतेलाच्या दरात कपात

ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार अडाणी विल्मर, रूची इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्यतेलाच्या कंपन्यांनी तेलाच्या दरात प्रतिकिलो १५ रूपये ते २० रूपये इतकी दरकपात केली आहे. त्याशिवाय जेमिनी एडिबल्स अॅण्ड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅच्युरल्स, दिल्ली, कोकुल रीफॉयल एंड सॉल्वेंट, विजय सॉल्वेक्स, गोकुल एग्रो रिसोर्सेस आणि एन प्रोटीन्स या कंपन्यांनी तेलाच्या दरात कपात केली आहे.

कशामुळे खाद्यतेलाच्या दरात कपात ?

आयात शुल्क (Import duty) मध्ये कपात केल्यानेच तेलाच्या दरात कपात झाली आहे. त्याशिवाय साठेबाजे रोखण्यासाठी स्टॉक लिमिट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलांच्या आयात करण्याच्या उपायासोबतच घरगुती तेल उत्पादन वाढवण्यासाठीचेही प्रयत्न भारतात होत आहेत.

तेलाच्या गरजेपैकी ६० खाद्यतेलाची आयात

खाद्य तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये सर्वाधिक खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. देशात खाद्यतेलाच्या एकुण मागणीपैकी ५६ ते ६० टक्के तेलाची आयात करण्यात येते. जागतिक पातळीवरच खाद्यतेलाच्या उत्पादनातील घट आणि आयात शुल्कात वाढ केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या किंमतीवर दबाव आहे. भारताअंतर्गत खाद्यतेलाच्या निर्मितीनंतर खाद्यतेलाची निश्चित होणारी किंमत ही आयात करण्यात येणाऱ्या तेलाच्या किंमतीनुसार निश्चित होते.