El Salvador News : फुटबॉल स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, चेंगराचेंगरीत 12जणांचा मृत्यू

सॅन साल्वाडोर : एल साल्वाडोरमध्ये (El Salvador) शनिवारी फुटबॉल सामना (football match) पाहण्यासाठी प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) 12 जण ठार आणि 100हून अधिक जखमी झाले. तथापि, येथून सुमारे 500 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सामना सुरू होण्याआधी एंट्री गेट बंद केल्यानंतर अनेक लोकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही घटना घडली. या दुर्घटनेसंदर्भातील फुटेज जारी करण्यात आले असून, त्यात अनेक लोक प्रवेशद्वारालगतची बॅरिकेड्स हटवताना दिसत आहेत. सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी ही घटना घडली. परिणामी त्यापुढचे खेळ रद्द करण्यात आला.

कस्कटलान स्टेडियमवर (Cuscatlan Stadium) शनिवारी हा सामना अलियान्झा एफसी आणि क्लब डेपोर्टिवो एफएएस यांच्यात सुरू होता. हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. त्याची क्षमता 44 हजारांहून जास्त आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खेळ थांबवण्यात आला.

अलियान्झा एफसी आणि क्लब डेपोर्टिवो एफएएस यांच्यातील सामन्यादरम्यान कस्कटलान स्टेडियमवर झालेल्या या दुर्घटनेबद्दल सल्वाडोरन फुटबॉल फेडरेशनने दुःख व्यक्त केले आहे. या घटनेचा अहवाल मागवला असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. क्रीडा स्थळांच्या सुरक्षेशीसंबंधित आयोगासोबत बैठक बोलावण्यात येणार आहे.

स्टेडियममध्ये घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी राष्ट्रीय नागरी पोलीस दल आणि अॅटर्नी जनरलमा कार्यालय यांच्यामार्फ्त स्टेडियममधील घटनांची सखोल चौकशी केली जाईल. संघ, व्यवस्थापक, स्टेडियम, लीग, फेडरेशन या सर्वांची चौकशी केली जाईल. दोषी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही, असे एल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी स्पष्ट केले.

इंडोनेशियामध्ये 135 प्रेक्षकांचा झाला होता मृत्यू
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या पूर्व जावा येथील एका स्टेडियममध्ये अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये 135 प्रेक्षकांनी आपला जीव गमावला होता. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ते बाहेर पडण्यासाठी धावत असताना चेंगराचेंगरीत अनेकांची मृत्यू झाला होता. एल साल्वाडोरमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अनेकांना या घटनेची आठवण झाली.