भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष माहितीये? १०० टक्के तुमचा अंदाज चुकणार

political parties in India
प्रातिनिधिक फोटो

लोकसभा निवडणुकीत यंदा २ हजार २९३ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक म्हटली की खर्च आलाच. खर्च आला तर देणग्याही आल्याच. देशातील दोन हजार २९३ पक्षापैकी ७ पक्ष राष्ट्रीय तर ५९ प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पावलेले आहेत. या सर्व पक्षांना आपल्याकडे आलेल्य देणग्याचा तपशील निवडणूक आयोगाकडे द्यावा लागतो. आता यामध्ये सर्व पक्षांमध्ये सर्वात श्रीमंत पक्ष कोण? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडला असेल. आता तुम्हाला वाटेल की सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला भाजप सर्वात श्रीमंत पक्ष असू शकतो किंवा सर्वात जास्त काळ सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष या यादीत असू शकतो. मात्र या दोन पक्षांची तुम्ही नाव घेत असाल तर चूक करत आहात. कारण देशातील सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचा क्रमांक लागतो.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. यावेळी उमेदवारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे विवरण जारी केले आहेच. पण त्याशिवाय पक्षांकडे किती बँक बॅलन्स आहे याची देखील माहिती निवडणूक आयोगाकडे असते. ही माहिती आता आयोगाने जाहीर केली आहे. या माहितीनुसार मायवतींच्या बसपाकडे एकूण ६७० कोटी रुपये आहेत, अशी माहिती समोर आले आहे.

हे वाचा – यावर्षी २,२९३ पक्ष लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

बसपा नंतर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष हा श्रीमंत पक्षाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सपाकडे एकूण ४७१ कोटींची संपत्ती आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे १९६ कोटीं रुपयांची संपत्ती आहे. तर तेलुगु देसम पार्टी १०७ कोटींच्या संपत्तीसहीत चौथ्या क्रमांकावर आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या पाच वर्षांपासून सत्तेवर असलेला आणि सदस्यांच्या संख्येत सर्वात मोठा मानला जाणारा भाजप पक्ष पाचव्या स्थानावर आहे. भाजपकडे फक्त ८२ कोटींची रक्कम आहे. भाजपला देणगी स्वरुपात हजारो कोटींच्या देणग्या मिळालेल्या आहेत. मात्र जाहीरातींसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपने ७५८ कोटी जाहीरातींवर खर्च केल्यामुळे त्यांच्याकडे फक्त ८२ कोटींची शिल्लक बाकी आहे.