गोष्ट एका शापित खुर्चीची, जो त्यावर बसला तो संपला

एका ३२० वर्षांपूर्वींच्या शापित खुर्चीची गोष्ट आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. या शापित खुर्चीवर जो कोणी बसला तो संपला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी वस्तू किंवा ठिकाण असतं ज्याबद्दल त्याला विशेष आसक्ती असते. पण जर तीच वस्तू किंवा ठिकाण एखाद्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरतं असेल त्याला शापित असं म्हटलं जातं. अशाच एका ३२० वर्षांपूर्वींच्या शापित खुर्चीची गोष्ट आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. या शापित खुर्चीवर जो कोणी बसला तो संपला आहे.

ही गोष्ट आहे १८ व्या शतकातली . इंग्लंडमधील थर्स्क (Thirsk) या भागात थॉमस बज्बी (Thomas Busby) नामक एकजण राहत होता. थॉमस आणि त्याचा साथीदार डेनियल औटी (Daniel Auty) यांच्यात घट्ट मैत्री होती. दोघाचा नकली नाण्यांचा कारखाना होता. दोघेजण फक्त बिझनेस पार्टनरच नव्हते तर थॉमसने डेनियलची मुलगी एलिझाबेथ बरोबर लग्नही केले होते. यामुळे यांच्यात सासरा जावयाचेही नाते होते. दिवसेंदिवस दोघांची मैत्रीही अधिक दृढ होत होती. दोघेही एकत्र जेवत फिरायला जात. पण दोघांना थर्स्क मधील एका बारमध्ये जायला आवडायचे. दोघे तिथे दारु रिचवत तासन तास बसून बिझनेस आयडीयांवर चर्चा करायचे. मात्र बारच्या ज्या कोपऱ्यात हे दोघे बसायचे तिथे एक खुर्ची होती जी थॉमसला फारच प्रिय होती. थॉमसला त्याच खुर्चीवर बसायला आवडायचे. त्यामुळे ते कधीही बारमध्ये गेले तर थ़ॉमससाठी बारमालक ती खुर्ची रिकामीच ठेवायची. त्यातही जर कोणी चुकून त्या खुर्चीवर बसले तर थॉमसचा रागाचा पारा चढायचा आणि त्यावरून तो समोरच्या व्यक्तीबरोबर हाणामारी करून त्याला तिथून उठवायचा आणि स्वत बसायचा. यामुळे बारमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला थॉमसच्या त्या आवडत्या खुर्चीबदद्ल माहिती असायचे. किंवा बारमालक नवीन ग्राहकांना त्या खुर्चीवर न बसण्याचा सल्ला द्यायचा. डेनियल यावरून थॉमसला चिडवायचाही.

पण एकदा कुठल्याशा कारणावरून थॉमस आणि डेनियल यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर थॉमसला चिडवण्यासाठी डेनियल त्याच्या आवडत्या खुर्चीवर जाऊन बसला. हे बघताच थॉमसचा रागाचा पारा एवढा वाढला की त्याने डेनियलची हत्या केली. दोघा मित्रांचे हे शत्रुत्व बघून संपूर्ण इंग्लडला धक्का बसला. त्यानंतर डेनियलच्या हत्येप्रकरणी थॉमसला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीच्या आधी नियमाप्रमाणे थॉमसला शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा आपल्या आणि डेनियलच्या फेवरेट बारमध्ये जाऊन आवडत्या खुर्चीवर बसून जेवण्याची इच्छा थॉमसने व्यक्त केली. त्याच्या या इच्छेस परवानगी देण्यात आली. थॉमसने त्याच खुर्चीवर बसून जेवणाचा आनंद घेतला. नंतर मात्र या खुर्चीवर बसण्याचे जो धाडस करेल त्याचा मृत्यू होईल असा श्राप त्याने दिला. त्याचा हा श्राप खऱा ठरला.

Medium.com च्या माहितीनुसार दुसऱ्या महायु्दधावेळी रॉयल एनफोर्सचे दोन पायलट त्या बारमध्ये आले. तेव्हा त्यांना थॉमस डेनियलच्या खुर्चीबद्दल त्यांना कळाले. यामुळे गंमत म्हणून दोघेही थॉमसच्या त्या फेवरेट खुर्चीवर आळीपाळीने बसले. पण बारमधून बाहेर पडल्यानंतर गाडीत बसून जाताना त्यांचे अॅक्सिडेंट झाले आणि त्यात दोघेही जागीच ठार झाले. त्यानंतर या खुर्चीची चर्चा संपूर्ण इंग्लडमध्ये सुरू झाली. अनेकजण उत्सुकता म्हणून या खउर्चीवर बसण्यासाठी बारमध्ये येऊ लागले. पण दुर्देवाने जे कोणी या खुर्चीवर बसले त्यांचा लगेचच वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. यामुळे बारमालकाने घाबरून ती खुर्ची गोदामात ठेवली. पण एकदा गोदामाची साफसफाई करताना एक कामगार थकल्याने चुकून या खुर्चीत बसला. त्यानंतर एक तासाच्या आतच त्याचा अॅक्सिडेंट होऊन मृत्यू झाला.

यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर बारमालकाने एका संग्रहालयाला ती शापित खुर्ची दान म्हणून दिली. तेव्हापासून संग्रहालयात ही खुर्ची जमिनीपासून ५ फूट उंचावर ठेवण्यात आली आहे. कोणीही त्यावर बसू नये यासाठी ही खुर्ची भिंतीला लटकवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आजही मोठ्या संख्येने लोक ही शापित खुर्ची बघायला संग्रहालयात गर्दी करतात. पण त्यावर बसण्याचे धाडस मात्र कोणीही करत नाही.