चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशभरात कोरोनाने कहर केले असताना यादरम्यान चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि ‘हिमालयाचे रक्षक’ म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बहुगुणा हे ९४ वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरलाल बहुगुणा यांना ८ मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनावर उतराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी शोक व्यक्त केला आहे.

बहुगुणा यांच्याबद्दल…

उत्तराखंडच्या टिहरी येथे ९ जानेवारी १९२७ रोजी बहुगुणा यांचा जन्म झाला होता. त्यांनी केवळ पर्यावरणावरच नाही तर अस्पृश्यतेविरोधातही आंदोलन केले. त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. गांधीजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘हिमालय बचाव’चे काम सुरू केले. आयुष्यभर त्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केले. त्यामुळे त्यांना ‘हिमालय रक्षक’ म्हणूनही ओळखले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ सुरू केली होती. देशभर या चळवळीचा परिणाम झाला. याच काळात त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची जगानेही दखल घेतली होती. वृक्षतोडीविरोधातील हे आंदोलन होते. मार्च १९७४ मध्ये शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून जगभर चर्चेत आले. समाजकार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९८० मध्ये ‘पद्मश्री’ आणि २००९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरवले गेले होते.